Friday, July 4, 2014

Less Marks, more opportunity after SSC

कमी मार्क जास्त संधी


कमी मार्क मिळाले म्हणजे करिअरचे सगळे राजमार्ग आपल्यासाठी बंद झाले, असा अनेकांचा समज होतो. पण तसं अजिबात नाही. करिअरच्या अनेक वाटा आहेत, फक्त त्या आत्मविश्वासाने शोधायला हव्यात. 

एफवायच्या प्रवेशाची प्रक्रिया संपून आता कॉलेजेस सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. पण ४५ ते ७० टक्क्यांदरम्यान गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांसमोरील करिअर निवडीचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. अशा विद्यार्थ्यांचे प्रमाण ५५ टक्क्यांच्या जवळपास आहे. या विद्यार्थ्यांना करिअरची योग्य दिशा सापडावी यासाठी मटातर्फे 'कमी मार्कांत उज्वल भविष्य' हा उपक्रम गेली काही वर्षे सातत्याने राबवला जात आहे. ठाण्यातील सरस्वती विद्यामंदिरमध्ये झालेल्या अशाच एक सेमिनारमध्ये करिअर कौन्सिलर सुचित्रा सुर्वे (डायरेक्टर, ग्रोथ सेंटर) आणि लक्ष्मीबाई ज्युनिअर कॉलेजच्या प्रिन्सिपल पूजा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना याबद्दल मार्गदर्शन केलं.

इंग्रजीची भीती सोडा, 

प्रा. पूजा कुलकर्णी 


सर्वप्रथम यांनी कमी गुण मिळण्याची कारणे याबद्दल सांगितले. यातील महत्वाचे कारण म्हणजे इंग्रजी भाषेबद्दलचा न्यूनगंड. बरेचदा दहावीमध्ये चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना बारावीत कमी गुण मिळतात. यामध्ये मराठी माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. याचं मुख्य कारण म्हणजे दहावीपर्यंतचा अभ्यास मातृभाषेत असल्याने तो सोपा वाटतो. पण इंग्रजीच्या बेसिक गोष्टींकडे लक्ष न दिल्याने इंग्रजीची भीती वाटू लागते. ही भाषा आपल्याला येणारच नाही या भीतीने एक प्रकारचा न्यूनगंड त्यांच्या मनात निर्माण होतो. याचबरोबर आजच्या सोशल मिडियामुळे इंग्रजीचा ऱ्हास होत आहे. मेसेजिंग लँग्वेजमुळे अनेक भाषांची सरमिसळ करून वाक्य लिहिली जात आहेत. पण त्यामुळे इंग्रजी वाक्यरचनेचा बेसच मुलांच्या लक्षात येत नाही. इंग्रजी वाचत नाहीत, लिहित नाहीत आणि मुख्य म्हणजे ऐकत नाहीत. त्यामुळेच त्यांची इंग्रजी भाषेची भीती अधिकाधिक गडद होत जाते. पण खरंतर या भीतीचं अवडंबर करण्याची मुळीच गरज नाही. इंग्रजीचा न्यूनगंड बाळगल्याने कितीतरी हुशार विद्यार्थी कोशात जातात. आपल्याला हे जमणारच नाही, एखादा विषय कळणारच नाही ही संकुचित वृत्ती निर्माण होते. त्यामुळे भीती न बाळगता यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. याची पहिली पायरी म्हणजे सकारात्मक दृष्टीकोन. सकारात्मक दृष्टीकोन बाळगणे १००% तुमच्याच हाती असते. कोणत्याही गोष्टीची घोकंपट्टी करण्यापेक्षा त्याचे अवलोकन करा. भरपूर वाचा. त्याचा अर्थ समजून घ्या. आपली पाठ्यपुस्तक व्यवस्थित वाचा. याचबरोबर विषयाशी निगडीत इतरही वाचन करा, त्यामुळे मूळ विषय सोपा वाटतो. इंग्रजी शिक्षणावर खूप भर देण्याचे कारण म्हणजे इंग्रजी तुमच्या करिअर आकार देणारा मुलभूत पाया आहे. इंग्रजी भाषा पक्की झाली कि त्या भाषेतील इतर विषय आपोआप समजतात. 

सकारात्मक विचार करा 

सुचित्रा सुर्वे 


अनेक विद्यार्थ्यांमध्ये असा गैरसमज आहे थोडे कमी मार्क मिळाले म्हणजे आपल्यासमोरील चांगल्या करिअरचे पर्याय संपले आहेत. पण कमी मार्क मिळाल्यानंतरही उत्तम करिअर घडवण्याचे अनेक पर्याय विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध आहेत. कमी मार्क आहेत म्हणून आपण झिरो आहोत हा विचार करणे सोडून द्या. ८०% पेक्षा जास्त मार्क मिळाले की फक्त मेडिकल आणि इंजीनिअरिंगचा विचार अजूनही केला जातो. त्यातही मेडिकल म्हटले की एमबीबीएस आणि इंजीनिअरिंग म्हटले की इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल अशा काही मळलेल्या वाटांचाच विचार केला जातो. मात्र या क्षेत्रांमध्ये अजूनही अनेक प्रकारचे विषय असतात. त्यामुळे कमी मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना कुछ हटके विचार करण्याची आणि चांगले करिअर निवडण्याची संधी निर्माण झालेल्या आहेत. कमी मार्क मिळाले म्हणून खचून न जाता सरळ बीए, बीकॉम बीएस्सी यांसारख्या प्लेन ग्रॅज्यूएशन कोर्सेसमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करा. त्यामुळे तुमचं बेसिक पक्कं होईल. हे कोर्सेस करताना तुम्हाला तुमच्या आवडीच्या विषयात शॉर्ट टर्म कोर्सेस, अॅडऑन कोर्सेस, हॉबी कोर्सेस करता येतील. आजकाल तरुणाईचा ओढा बीएएफ, बीएमएम, बँकिंग इन्श्युरन्स यांसारख्या सेल्फ फायनान्स कोर्सेसकडे आहे. प्लेन ग्रॅज्यूएशन कोर्सेसमधून तुम्हाला त्याच दर्जाचं शिक्षण मिळतं. त्यामुळे प्लेन पदवीनंतर तुम्हालाह या क्षेत्रांमध्ये संधी मिळतात. याचबरोबर बीएस्सी करून तुम्ही मेडिकलच्या पॅरामेडीकल, आयुर्वेद, इंजिनीअरिंगच्या सिरॅमिक, अॅग्रीकल्चरल यांसारख्या वेगळ्या वाटांचा विचार करावा. त्याचबरोबर नर्सिंग आणि टीचिंग क्षेत्रात अनेक संधी आज निर्माण झाल्या आहेत. याचबरोबर आर्ट‍्समधूनही अनेक संधीची दारे उघडली गेली आहेत. हिस्टरी, फिलॉसॉफी, सायकॉलॉजी, इकोनॉमिक्स आणि महत्वाचं म्हणजे रिसर्च क्षेत्रात आर्ट‍्सचे विद्यार्थी करिअर करू शकतात. 

इतरही काही पर्याय... 

बायोटेक्नॉलॉजीमध्ये करिअर... बायोटेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात रिसर्च करणाऱ्यांसाठी खूप संधी आहेत. प्लेन सायन्सनंतर बायोलॉजी आणि बायोटेकनॉलॉजी करता येईल. 

एनडीए... एनडीएची प्रवेश प्रक्रिया ही खूपच कठीण असते. त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. लेखी परीक्षेनंतर फिजिकल टेस्टसुद्धा पास होणे गरजेचे असते. एनडीएमधून बाहेर पडल्यानंतर सैनिक म्हणून नाही तर कमांडर पदासाठी नियुक्ती होते. त्यानंतर विद्यार्थ्यांना डिफेन्सच्या आर्मी, नेव्ही, आणि एअरफोर्स यापैकी कोणत्याही भागात ७ वर्षांच्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन मिळते. ७ वर्षानंतर विद्यार्थ्याला त्याच्या इच्छेनुसार पुढे सर्व्हिस वाढवता येते अथवा तो निवृत्ती घेऊन सिव्हिल आयुष्य जगू शकतो. डिफेन्समधून निवृत्ती घेतल्यानंतर कोणत्याही कंपनीत जॉब मिळतो. 

अॅग्रीकल्चर... अॅग्रीकल्चर म्हणजे केवळ शेती करणं नसून यामध्ये पिके, मासे यांसारख्या विषयात रिसर्चसाठी खूप संधी उपलब्ध आहेत. माणसाला जगण्यासाठी अन्नाचीच गरज असल्याने अन्न निर्मिती आणि फूडरिसर्च या क्षेत्रामध्ये नेहमीच खूप संधी उपलब्ध असतात.

No comments:

Post a Comment