मराठी बीएमएमला आले चांगले दिवस
मराठी बीएमएमला घरघर लागल्याची परिस्थिती गेली काही वर्षे सर्वच कॉलेजांमध्ये दिसून येत होती. पण यंदाची प्रवेश प्रक्रिया पहिली, तर मराठी माध्यमातील बीएमएम अभ्यासक्रमाकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली दिसते. अनेक कॉलेजांमध्ये उपलब्ध जागा भरून अनेक विद्यार्थी 'वेटिंग लिस्ट'वर असल्याचे दिसत आहे. निकालाची वाढलेली टक्केवारी, मराठी बीएमएम केलेल्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या चांगल्या प्लेसमेंट्स यामुळे अनेक विद्यार्थी मराठी बीएमएमकडे वळत असल्याचे समजते.
पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या मराठी बीएमएमला गेल्या वर्षीपर्यंत फारसा प्रतिसाद नव्हता. सोयी-सुविधा न मिळणे, प्राध्यापक नसणे अशा अनंत अडचणींना विद्यार्थ्यांना सोमोरे जावे लागत होते.
६० विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या बॅचमध्ये जेमतेम ३० ते ४० विद्यार्थी प्रवेश घेत होते. मराठी बीएमएमला प्रतिसाद नसल्याचे सांगत मुंबईतील दोन प्रतिष्ठित कॉलेजांनी हा कोर्स बंदही केला होता. पण ही परिस्थिती आता सुधारताना दिसत आहे. अनेक कॉलेजांमध्ये यंदा उपलब्ध जागा भरून अनेक विद्यार्थी 'वेटिंग लिस्ट'वर असल्याचे दिसत आहेत. निकालाची वाढलेली टक्केवारी, इंग्रजी बीएमएमची वाढलेली कट ऑफ, मराठी बीएमएम केलेल्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या चांगल्या प्लेसमेंट या कारणांमुळे अनेक विद्यार्थी मराठी बीएमएमकडे वळत असल्याचे सांगितले जाते. मराठी बीएमएमकडे वाढलेला कल पाहता साठ्ये कॉलेज आणि रुइया कॉलेजने १० टक्के वाढीव जागांसाठी मागणी केली आहे.
No comments:
Post a Comment