Wednesday, July 30, 2014

स्पर्धा परीक्षांच्या यशाचा मार्ग! How to get success in Competative Exams - In marathi language

स्पर्धा परीक्षांच्या यशाचा मार्ग!


स्पर्धा परीक्षांमधून ‌करिअरच्या विविध वाटा फुटतात. पण याविषयी अनेक विद्यार्थ्यांना पुरेशी माहितीच नसते. त्यामुळेच महाराष्ट्र टाइम्स, मुंबई विद्यापीठ आणि संकल्प आयएएस फोरम यांनी एकत्रितपणे 'स्पर्धा परीक्षांमध्ये मिळवा यश!' या सेमिनारचं आयोजन केलं होतं. 

एमपीएससी, यूपीएससी या स्पर्धा परीक्षांमध्ये वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे. या स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश ‌कसे मिळवावे, या परीक्षांची तयारी नेमकी कधी आणि कशी करावी? याबद्दल सखोल मार्गदर्शन देण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स, मुंबई विद्यापीठ आणि संकल्प आयएस फोरम यांनी एकत्रितपणे 'स्पर्धा परीक्षांमध्ये मिळवा यश!' या सेमिनारचं आयोजन केलं होतं. जय वाघमारे व अक्षय तापडिया या यूपीएससी परीक्षेमधील यशस्वी विद्यार्थीसह स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, संतोष रोकडे, संकल्प आयएएस फोरमच्या ज्योती रामदास, वसई -विरार महानगरपालिकाच्या उपायुक्त संगीता धायगुडे यांनी विद्यार्थ्यांना आपले अनुभव सांगितले आणि सखोल मार्गदर्शनही केलं. या सेमिनारला विद्यार्थी-पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. 

ध्येयवेडे व्हा 

स्पर्धा परीक्षांकडे करिअर म्हणून पाहायचं असेल, तर विद्यार्थ्याने ध्येयवेडं असणं, अतिशय गरजेचं आहे. एखाद्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम किंवा परीक्षेचं स्वरूप बदललं तर त्याची कारण समजून घेणं, महत्त्वाचं असतं. स्पर्धा परीक्षांमध्ये उतरणारे सर्वच विद्यार्थी हुशार असतात. पण या स्पर्धेत टिकून रहायचं असेल तर कल्पकता असणं गरजेचं आहे. हुशार असण्यापेक्षा स्मार्ट असाल तर या परीक्षांमध्ये तुम्ही सहज उजवे ठराल. अभ्यास पूर्ण असेल, तुमच्या उत्तरांवर ठाम राहू शकत असाल तरच परीक्षेला सामोरं जा. परीक्षेचा अभ्यास करत असताना कोणत्याही रेडीमेड अभ्यास साहित्यावर विसंबून राहू नका. डिग्री पूर्ण झाल्यावर स्पर्धा परीक्षा देणार असाल तर तेरावीपासूनच परीक्षेच्या तयारीला सुरुवात करा. डिग्री पूर्ण झाल्यावरसुद्धा खंबीर पाठिंबा म्हणून एखादी नोकरी शोधा. एमपीएससीचा अभ्यास करत असाल तर गणित आणि इंग्रजीच्या अभ्यासावर विशेष भर द्या. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अनेक पुस्तक बाजारात उपलब्ध आहेत. केवळ आयएएस झालेल्या व्यक्तींनी लिहिलेलीच पुस्तक वाचा. सरकारी अधिकारी म्हणून काम करताना तुम्हाला राज्यघटनेच्या चौकटीत राहून काम करावं लागतं. तेव्हा स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे प्रश्न हे सहज सोप्पे असतात. मात्र त्यांची नेमकी ठाम उत्तर विद्यार्थ्यांना देता आली पाहिजेत. तुमच्या विचारांत सुस्पष्टता असणं, यावेळी महत्त्वाच ठरतं. स्वतःचे नोट्स काढल्यास त्याचा फायदा यावेळी निश्चितपणे होतो. कोणत्याही योजनेची बांधणी करताना त्या योजनेचा कोणी गैर फायदा घेणार नाही. योजनेचा दुसरा पर्यायी अर्थ निघणार नाही. योजनेत कोठेही पळवाट निघणार नाही, या सर्व बाबींची काळजी घेणं गरजेचं असतं. यासाठी तुमचे विचार हे नियोजनबद्ध असणं, अतिशय महत्त्वाचं आहे. कोणाच्याही दबावाखाली काम न करता एखादी योजना ठामपणे यशस्वी पार पाडून दाखवेन हा ठामपणा तुमच्यात असावा. तुम्ही कोणत्याही क्षेत्रातून स्पर्धा परीक्षांकडे वळलात तरी हरकत नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये सर्व क्षेत्रांना समान संधी आहेत. चांगले अधिकारी असाल तर तुम्हाला खूप संधी उपलब्ध आहेत. 

- संतोष रोकडे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक 

अपयशाने शिकवलं 

इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला असतानाही आयुष्यात पुढे काय करायचं, हे माझ पक्कं नव्हतं. तेव्हा दहा वर्षानंतर मला स्वतःला कोणत्या स्थानी पाहायचं आहे, याचा मी विचार करू लागलो. कॉलेजमध्ये अभ्यासासोबतच सामाजिक उपक्रमांतही प्रामुख्याने असायचो. या वेळीच मला युपीएससीच्या परीक्षांची ओळख झाली. मित्र म्हणाले की, इंजिनीअरिंग आणि युपीएससी दोन्ही एकत्र का देत नाही. तेव्हा मी अभ्यासक्रम पहिला आणि अभ्यासाला लागलो. पुरेशी तयारी नसतानाही परीक्षेला सामोरा गेलो होतो. कँपस इंटरव्ह्यूमध्ये चांगली नोकरी मिळाली असतानाही आपण या नोकरीला पुरेसा न्याय देऊ शकत नाही, ही भावना सतत मनात होती. तेव्हा ही नोकरी सोडून पूर्ण वेळ युपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली. बेसिक गोष्टी समजून घेण्याकडे भर दिला. प्रिलियम्समध्ये मोजकेच गुण मिळाले. पण मेन्ससाठी पात्र झाल्याने आता कमी वेळात जितकं समजेल तितकं पटापट आत्मसात करून घेणं, गरजेच होतं. पण विषयाची आवड असेल, मनापासून अभ्यास केला तर विषय पटापट समजू लागतो, असं म्हणतात. माझ्या बाबतीतही तसंच होत होतं. पण दिवसभर अभ्यास करूनही तिथे माझी डाळ शिजली नाही. बराच मागचा नंबर मिळवत पास झालो. हे मोठं अपयश पचवत परत दोन दिवसांनी अभ्यासाला लागलो. मेहनतीशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही, हे तेव्हा कळून चुकलं होतं. तेव्हा वर्षभर प्रामाणिकपणे अभ्यास करत दुसऱ्या प्रयत्नात ३०३ वा आलो. पण त्या अपयशाने खूप काही शिकवलं. अपयशाने खचून न जाता अधिक मेहनतीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुमच्यात जर आवड असेल, तळमळ असेल तर तुमच्या पासून ते यश कोणीही हिसकून घेऊ शकत नाही. युपीएससीसाठी मेहनत घेत असाल तर एकमेकांना मदत करा. अभ्यासाचे साहित्य एकमेकांशी शेअर करा. युपीएससीचा असा मिळून मिसळून अभ्यास केला तरच पुढे जाता येत. युपीएससी आणि तुमचे सहकारी यांच्याबाबत योग्य दृष्टीकोन ठेवा. इतर व्यक्ती काय सल्ला देत आहेत, या पेक्षा आपल्या अभ्यासाला प्राधान्य द्या. मुलाखतीला जाताना कोणत्याही विषयाचा कमी जास्त अभ्यास करायचा नसतो. परीक्षेमध्ये कोणताही अमुक असा ट्रेंड नसतो, हे लक्षात घ्या. सर्व विषयांचा समान अभ्यास करा. अमुक एक प्रश्न परीक्षेत का विचारला गेला आहे, हे नीट समजून घ्या आणि त्यानुसारच उत्तर द्या. मुलाखत सर्वस्वीपणे तुमच्यावरच अवलंबून असते. मुलाखतीच्या वेळी बारीक बारीक गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या असतात. पण सर्वांत आधी तुम्ही स्वतःला दहा वर्षानंतर कोणत्या स्थानी पाहायचं आहे, हे आजच ठरावा. 

-अक्षय तापडिया, युपीएससी २०१३ मध्ये ३०३ वा 

अवांतर वाचनाला पर्याय नाही 

स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वाचनावर अधिक भर द्यायला हवी. यामध्ये पुस्तकांच्या वाचानापेक्षाही अवांतर वाचनावर अधिक लक्ष द्यायला हवं. त्यांच्याकडे फक्त ज्ञान असून चालत नाही तर त्याच सोबत मेहनत घेण्याचीही तयारी असावी लागते. प्रत्येकालाच स्पर्धा परीक्षा द्यायची असते. पण त्यासाठी घ्यावी लागणारी प्रचंड मेहनत मात्र अनेकांना नको असते. यशस्वी होण्यासाठी स्वप्न, संधी आणि साध्य हे तीन शब्द अतिशय महत्त्वाचे असतात. यशस्वी होण्यासाठी स्वप्न पाहणं, अतिशय गरजेचं असतं. स्वप्न पाहताना तुम्ही पाहत असलेलं स्वप्न हे नेहमी मोठं असावं. योग्य संधी लक्षात घेऊन हे स्वप्न साध्य करण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी नेहमीच असावी. यासाठी स्वतःला झोकून देता आला पाहिजे. देश बदलायचा असेल तर स्वतःपासून सुरुवात करायला हवी. युवा वर्ग स्पर्धा परीक्षांकडे वळायला हवा. ध्येय वेड असणं म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं. मग तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. 

- संगीता धायगुडे, उपायुक्त, 

वसई -विरार महानगरपालिका 

अभ्यासाचं नियोजन करा. 

सरकारी नोकरी, चांगलं पद, भरगच्च पगार आणि फिरायला सरकारी गाडी; इतकाच स्पर्धा परीक्षांचा अर्थ मला ठाऊक होता. आयआयटीमधून इंजिनीअरिंगचं शिक्षण घेण्याचं स्वप्न प्रत्येकाचंच असतं. माझं सुद्धा हे स्वप्न होतं. मात्र आयआयटीमधून इंजिनीअरिंग पूर्ण केल्यावर मला त्यात फार रस नाही, दिसून आलं. तेव्हा आयआयएममधून मी माझं एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं. आणि आयबीएमसारख्या मोठ्या कंपनीत बड्या पगाराची नोकरीही मिळाली. तिथे मोठमोठ्या प्रकल्पांवर काम करताना अनेक सरकारी अधिकाऱ्यांना भेटता आलं. त्यांच्या बोलण्यातून मला स्पर्धा परीक्षांबद्दल माहिती मिळाली. ते करत असलेलं काम फार आवडलं. मग आणखी काही अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला. कंपनीला फायदा मिळवून देण्यापेक्षा देशाला फायदा मिळवून देण्याचं हे उत्तम साधन असल्याचं तेव्हा मला कळालं. माझे काही मित्रसुद्धा युपीएससीची तयारी करत होते. त्यांनाही मी जाऊन भेटलो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीत तुम्हाला इथे समाजात काम करण्याची संधी तुम्हाला इथे मिळते, हे समजलं. सर्वांची मतं जाणून घेत अखेर दोन ते तीन महिन्यांनी ठाम निर्णय घेत मी नोकरी सोडली. तेव्हा प्रिलियमला केवळ पाच महिने उरलेले असताना मी अभ्यासाला सुरुवात केली. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास कसा करावा, इतकंच माझ्या मनात होतं. त्यानुसार प्रामाणिकपणे अभ्यास केला. स्वतःशी प्रामाणिक राहिलो. वाचनावर भर दिला. वाचलेलं समजून घेऊन त्याच्यावर खोलात जाऊन अभ्यास केला. त्या अभ्यासाचा संबंध समाजातील इतर गोष्टींशी लावण्याचा प्रयत्न केला. त्याचाच निश्चितपणे फायदा झाला. पहिल्याच प्रयत्नात नंबरात आलो. नीट वेळापत्रक बनवून अभ्यासाचं नेमकं नियोजन करा. सातत्याने अभ्यास केला तर त्याचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो. 

-जय वाघमारे, युपीएससी २०१३ मध्ये ९७३ वा 

नियोजन महत्त्वाचं... 

तुमचा स्वाभाविक कल आणि दृष्टीकोन सगळ्यात महत्त्वाचा आहे. दृष्टीकोन योग्य असेल तर स्वाभाविक कल बनवणं सहज शक्य होईल. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपला अभ्यास हा केवळ पुस्तकांपुरता मर्यादित न राहता त्यावर पुरेसं संशोधन होणं, गरजेचं आहे. आपला देश हाच आपला अभ्यास असल्याने त्याचं विद्यार्थ्यांना दडपण येण्याचं अजिबात कारण नाही. योग्य दिशेने योग्य प्रयत्न करत योग्य नियोजनाच्या सहाय्याने योग्य तयारी केली तर स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणं, फार अवघड नाही. जिद्द आणि समर्पित वृत्ती विद्यार्थ्यामध्ये असेल तर स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी निश्चितपणे उतरावं. 

- ज्योती रामदास, संकल्प आय ए एस फोरमच्या ज्येष्ठ अध्यापक 

मराठीचा न्यूनगंड कशाला? 

मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे वळताना दिसतायत. मातृभाषेवर जर प्रभुत्व असेल तर कोणतीही भाषा शिकणं तुम्हाला फार अवघड वाटणार नाही. मराठी माध्यमातून शिक्षण झालं असेल तरी इंग्रजी आणि गणित या दोन विषयांकडे अधिक लक्ष देणं गरजेचं ठरेल. पण केवळ मराठी माध्यमातून शिक्षण झाल्याचं डोक्यात ठेऊन न्यूनगंड बाळगण्याच कारण नाही. 

आरक्षणाचा विचार नको 

स्पर्धा परीक्षानंतर भरतीमध्येही संविधानिक आरक्षणाचे सर्व नियम लागू होतात. पण माणूस म्हणून आणि एक अधिकारी म्हणून सक्षम असाल तर आरक्षणाचा विचार करण्याची गरज नाही. भरतीच्या वेळी अनेक जागा अनेक पद उपलब्ध आहेत. आरक्षण आणि गुणवत्ता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अखेर गुणवत्तेशिवाय पर्याय नाही. तेव्हा आरक्षणापेक्षा गुणवत्तेला महत्त्व द्या. 

अभ्यासेतर उपक्रमही महत्त्वाचे... 

कॉलेजमध्ये तुम्ही सहभागी असलेल्या अभ्यासेतर उपक्रमांनासुद्धा स्पर्धा परीक्षांमध्ये महत्त्व दिलेलं आहे. स्पर्धा परीक्षांचा अर्ज भरताना तुम्हाला याबाबत लिहायचं असतं. एनएसएस, एनसीसी, स्टूडन्ट कौन्सिल, आदी उपक्रमांतील तुमचा सहभाग तुम्ही इथे नोंदवू शकता. मुलाखतीच्या वेळी तुम्हाला या उपक्रमांबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात. या प्रश्नांची नेमकी उत्तरं देणं गरजेचं असतं. नेतृत्त्व गुण, सामाजिक बांधिलकी, निर्णयक्षमता आदी गुण या प्रश्नांमधून तपासले जातात.

No comments:

Post a Comment