एक सुट्टी पाऊण तासाची
दिवसातून थोडा तरी वेळ स्वतःसाठी काढला पाहिजे, स्वतःच्या आवडत्या छंदासाठी, फिटनेससाठी किमान अर्धा तास तरी काढला पाहिजे... वगैरे वगैरे असं स्त्रियांना सतत सांगितलं जातं. मुद्दा अगदी खरा असला, तर प्रश्न येतो, तो खरंच असा वेळ काढता येतो का याचा. कित्येकींना इच्छा असूनही स्वतःसाठी वेळ काढता येत नाही किंवा स्वतःसाठी वेळ काढायचा आहे हेही लक्षात राहात नाही. मग एक दिवस सगळं नकोनकोसं वाटतं. खरंच थोडासा वेळ काढून स्वतःचे लाड करावेसे वाटतात. चक्क सुट्टी घेऊन कुठेतरी निघून जावंसं वाटतं. वेगळ्या ठिकाणी फिरून आल्यानंतर मिळणारी ऊर्जा हवीहवीशी वाटते; पण जाणार कसं? म्हणून आम्ही तुम्हाला फक्त ४५ मिनिटांत सुट्टीवर जाऊन आल्यासारखा ताजेपणा कसा अनुभवायचा ते सांगणार आहोत.
साहित्य - या ४५ मिनिटांसोबतच थोडंसं साहित्यही आपल्याला लागणार आहे. ते असं... खूप दिवस वाचायचं राहून गेलेलं किंवा खूप आवडीचं एखादं पुस्तक, आवडत्या रंगाचं नेलपॉलिश, एक छोटा टब भरून कोमट पाणी, पेपरमिंट सॉल्ट (नसल्यास साधं मीठ), मऊ, गुबगुबीत टॉवेल, आवडतं ड्रिंक, आवडतं संगीत आणि आवडीचं खाणं.
काय करायचं?... सगळ्यात आधी मोबाइल, लँडलाइन, घराची बेल, टीव्ही, लॅपटॉप बंद करा.
घरातली तुमची आवडती जागा किंवा निसर्गरम्य दृष्य दाखवणारा एखादा कोपरा, खिडकी पकडा. तिथून दिसणारं दृश्य जितकं चांगलं तितकं छान. तिथं बसा आणि वाऱ्याची झुळूक अंगावर घेत आवडत्या ड्रिंकचा एक घोट घ्या. मग, तुमचे तळपाय टबमधल्या कोमट पाण्यात बुडवा. त्यात पेपरमिंट सॉल्ट टाका. आता मस्तपैकी मागे टेकून बसा आणि पुस्तक उघडा. ही झाली तुमचं मन रिलॅक्स करण्यासाठीची पहिली पायरी.
२० मिनिटांनंतर टबमधून पाय बाहेर काढा आणि टॉवेलनं पुसून घ्या. नखांना आवडीचं नेलपॉलिश लावा... ड्रिंकचा आस्वाद घेणं थांबवू नका. अधेमधे एखादा घोट घेत राहा. हळूहळू तुमचं मन शांत झालंय असं तुम्हाला जाणवेल. सगळ्या काळज्या, ताण यापासून मन दूर गेलंय आणि हलकं झालंय असं तुम्हाला वाटायला लागेल. मग, तुमच्या आवडत्या जेवणावर ताव मारा. या शॉर्ट अँड स्वीट ब्रेकनंतर येणारं फिलींग सुखदच असणार हे नक्की!
No comments:
Post a Comment