Wednesday, July 30, 2014

10:06 PM

बारावीनंतर घ्या सरकारी नोकरी

सरकारी नोकरी मिळवणं हे आजही अनेक मराठी मुलांसाठी एक स्वप्न असतं. केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत भरती होत असते. याबाबतच्या जाहिराती वेळोवेळी निघत असतात. स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत केंद्र सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर व लोअर डिव्हिजन क्लार्कसाठी भरती केली जाते. यासाठी कम्बाईन्ड हायर सेकंडरी लेव्हल एक्झामिनेशन २०१४ ची जाहिरात नुकतीच प्रकाशित झाली आहे. वरील पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना काही वर्षांनी विभागीय परीक्षा देऊन उच्च पदावर अधिकारी म्हणूनही कामाच्या संधी उपलब्ध होतात .

शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण विद्यार्थी

वयोमर्यादा - १८ ते २७ वर्षे.

प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत : १९ ऑगस्ट २०१४

परीक्षा फी : १०० रुपये ( महिला तसेच एस.सी., एस.टी. व अपंग उमेदवारांना फी नाही )

परीक्षा दिनांक - २ व ९ नोव्हेंबर २०१४

विद्यार्थी प्रवेश अर्ज संबंधित विभागीय ऑफिसमध्ये अर्ज पाठवू शकतात किंवा ऑनलाइन अर्ज भरू शकतात . परीक्षेसाठी केवळ एकच अर्ज पाठवावा. महाराष्ट्राचे विभागीय केंद्र मुंबई येथे असून परीक्षा केंद्रे औरंगाबाद , मुंबई , कोल्हापूर , नागपूर , पुणे , नाशिक , अमरावती येथे आहेत .

निवड प्रक्रिया -

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, स्कील टेस्ट (डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठी), टायपिंग टेस्ट (लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी) द्वारे केली जाते

लेखी परीक्षा-

लेखी परीक्षा २०० गुणांची असून प्रश्नपत्रिकेचे स्वरुप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असते. कालावधी २ तासांचा असतो. प्रश्नपत्रिका इंग्रजी व हिंदी माध्यमातून उपलब्ध असतील. लेखी परीक्षेत चार विषयावर प्रत्येकी ५० गुणांचे प्रश्न विचारले जातात. चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा केले जातात.

विषय

१)सामान्य बुध्दीमापन २) इंग्रजी भाषा ३) क्वांटिटेटिव्ह अॅप्टिटयुड ४) सामान्य ज्ञान

स्कील टेस्ट-

डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठी स्कील टेस्ट घेतली जाते. लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना स्कील टेस्टसाठी बोलावले जाते. स्कील टेस्टमध्ये १५ मिनिटे इंग्रजी भाषेत टायपिंग करायला सांगितले जाते. टायपिंगचा वेग तासाला ८००० की डिप्रेशन इतका असणे आवश्यक आहे. या टेस्टमध्ये केवळ उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी वेगळे गुण दिले जात नाहीत.

टायपिंग टेस्ट -

लोअर डिव्हिजन क्लार्कसाठी लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना टायपिंगच्या परीक्षेसाठी बोलावले जाते. टायपिंग टेस्ट हिंदी किंवा इंग्रजी भाषेत घेतली जाते. इंग्रजी भाषेतल्या टायपिंगचा वेग ३५ शब्द प्रती मिनिट तर हिंदी भाषेतील टायपिंगचा वेग ३० शब्द प्रति मिनिट इतका असणे आवश्यक आहे. टायपिंगची परीक्षा संगणकावर घेतली जाते यामध्ये १० मिनिटे दिलेल्या उताऱ्याचे टायपिंग करायचे असते.

या परीक्षेच्या अधिक माहितीसाठी http://ssc.nic.in ही वेबसाईट पहावी.
10:05 PM

रिटेलचा भाव वधारलाय Career Jobs in Retail Industry


रिटेल इंडस्ट्री ही आज देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक बनलीय. अधिकाधिक किफायतशीर दरांमध्ये वस्तू मिळत असल्याने आपोआपच मॉल्स, मोठमोठाल्या स्टोअर्सकडे ग्राहकांची पावलं वळताना दिसतायत. त्यामुळे रिटेल क्षेत्रात रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहेत.

आजच्या काळात रिटेल इंडस्ट्रीचा खूप झपाट्याने विकास होतोय. एक 'हॅपनिंग' उद्योगक्षेत्र म्हणून या क्षेत्राकडे पाहिलं जातंय. रिटेल इंडस्ट्री ही आज प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक बनली आहे. या क्षेत्रातील स्पर्धात्मक वातावरणामुळे ग्राहकांना कमीतकमी किंमतीत दर्जेदार वस्तू मिळतात. अनेक मॉल्स, स्टोअर्सकडून खरेदी केलेल्या वस्तूंची घरपोच डिलिव्हरी मिळते. उत्तम सेवा, एक व्यावसायिक दृष्टिकोन असणारं हे क्षेत्र म्हणूनच आज ग्राहकांना, सर्वसामान्यांना आपलंसं वाटू लागलं आहे. मनाजोगती खरेदी आणि तुलनेने वाजवी किंमत यामुळे मॉल्स अर्थात या रिटेल इंडस्ट्रीचा भाव वधारला आहे.

कामाचं स्वरुप :

या क्षेत्रात विविध पदांवर काम करावं लागतं. एक्झिक्युटिव्ह किंवा ट्रेनी म्हणून करिअरची सुरुवात करताना स्टोअरच्या विविध विभागांत काम करावं लागतं. इथल्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये काम करून विक्री, मार्केटिंग आणि व्यवस्थापकीय कौशल्य विकसित होत जातात. मात्र, इथे काम करताना खूप तास काम करण्याची तयारी ठेवायला हवी. रिटेल मॅनेजर म्हणून जबाबदारी सांभाळताना सलग अनेक तास काम करणं अपेक्षित असतं. कामाचा ताण सहन करायची तुमची तयारी हवी. याशिवाय, वीकेंडला प्रचंड संख्येने येणार्या ग्राहकांना सांभाळणं जमलं पाहिजे. खूप तास काम आणि कामाचा ताण हा वीकेंडला अधिक असतो. रिटेल स्टोअर्स सकाळी लवकर सुरू होतात आणि रात्री उशिरा बंद होतात. रविवारी आणि बँक हॉलिडे म्हणजे सुटीच्या दिवशीसुद्धा काम करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. तसंच, दिवसभर उभं राहून काम करावं लागतं. यासाठीही तुमची तयारी असायला हवी.

पुढील कामांचा समावेश यात होतो :

कर्मचाऱ्यांवर आणि त्यांच्या कामावर देखरेख करणं.

दुकानात (डिपार्टमेंटल स्टोअर्स) आलेल्या ग्राहकांना चांगली सेवा देणे. तसेच, या ग्राहकांच्या तक्रारींचं तात्काळ निवारण करणं.

व्यापारी संकल्पना, योजना आकर्षकरित्या मांडणं.

स्टोअर्सचा स्टॉक तपासणं, त्यावर लक्ष ठेवणं. तसंच, ऑर्डर्स आणि पुरवठा आदी गोष्टींकडे लक्ष पुरवणं

दुकानातील मालाच्या विक्रीचा आणि आर्थिक उलाढालीचा रेकॉर्ड ठेवणं.

सुरक्षा प्रक्रियांची अंमलबजावणी आणि देखरेख करणं.

आपल्या आउटलेटमधील विक्रीचं लक्ष्य (टार्गेट) साध्य होतंय की नाही ते पाहणं. हे लक्ष्य साध्य होत नसल्यास योग्य त्या उपाययोजना करणं.

या क्षेत्रातला प्रवेश :

या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी तुमच्याकडे खूप उच्च शिक्षण असणं गरजेच आहे, असं अजिबात नाही. प्रोफेशनल स्तरावरील उच्च शिक्षण नसतानाही तुम्ही या क्षेत्राकडे वळू शकता. बारावी किंवा ग्रॅज्युएशननंतर डिप्लोमा/बॅचलर कोर्स करून तुम्ही रिटेल मॅनेजमेंट क्षेत्रात स्वत:चं करिअर घडवू शकता.

नोकरीच्या संधी :

कस्टमर सेल्स असोसिएट

डिपार्टमेंट मॅनेजर/पुलोअर मॅनेजर/

कॅटेगरी मॅनेजर

स्टोअर मॅनेजर

रिटेल ऑपरेशन मॅनेजर

रिटेल बायर्स अँड मर्कंडायझर्स

व्हिज्युअल मर्कंडायझर्स

मॅनेजर बॅक एंड ऑपरेशन्स

लॉजिस्टिक्स अँड वेअरहाउस मॅनेजर्स

रिटेल कम्युनिकेशन मॅनेजर

मॅनेजर प्रायव्हेट लेबल ब्रँड्स

रिटेल मार्केटिंग एक्झिक्युटिव्हज

या क्षेत्रात करिअरच्या प्रचंड संधी आहेत. डिपार्टमेंटल स्टोअर्स, डिझायनर्स बुटिक, पास्ट फूड चेन्स, म्युझिक स्टोअर्स, सुपर मार्केट्स, कंपनी स्टोअर्स, इलेक्ट्रॉनिक्स शो रुम्स, ऑटोमोबाइल डीलर्स यांसारख्या अनेक ठिकाणी रिटेल मॅनेजरची आवश्यकता असते. याशिवाय, मोठमोठ्या कंपन्यांच्या फ्रँचायझीमध्येही कामाच्या संधी मिळू शकतात.

हे कोर्स उपलब्ध असणाऱ्या काही संस्था :

एल.एन. वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च www.welingkar.org

सिम्बॉयसिस सेंटर पॉर डिस्टन्स लर्निंग www.scdl.net

एस.पी. जैन इन्स्टिट्यूट ऑप मॅनेजमेंट अँड रिसर्च f2www.bcids.org

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ज्वेलरी www.iij.net.in
12:17 AM

स्पर्धा परीक्षांच्या यशाचा मार्ग! How to get success in Competative Exams - In marathi language

स्पर्धा परीक्षांच्या यशाचा मार्ग!


स्पर्धा परीक्षांमधून ‌करिअरच्या विविध वाटा फुटतात. पण याविषयी अनेक विद्यार्थ्यांना पुरेशी माहितीच नसते. त्यामुळेच महाराष्ट्र टाइम्स, मुंबई विद्यापीठ आणि संकल्प आयएएस फोरम यांनी एकत्रितपणे 'स्पर्धा परीक्षांमध्ये मिळवा यश!' या सेमिनारचं आयोजन केलं होतं. 

एमपीएससी, यूपीएससी या स्पर्धा परीक्षांमध्ये वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे. या स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश ‌कसे मिळवावे, या परीक्षांची तयारी नेमकी कधी आणि कशी करावी? याबद्दल सखोल मार्गदर्शन देण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स, मुंबई विद्यापीठ आणि संकल्प आयएस फोरम यांनी एकत्रितपणे 'स्पर्धा परीक्षांमध्ये मिळवा यश!' या सेमिनारचं आयोजन केलं होतं. जय वाघमारे व अक्षय तापडिया या यूपीएससी परीक्षेमधील यशस्वी विद्यार्थीसह स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, संतोष रोकडे, संकल्प आयएएस फोरमच्या ज्योती रामदास, वसई -विरार महानगरपालिकाच्या उपायुक्त संगीता धायगुडे यांनी विद्यार्थ्यांना आपले अनुभव सांगितले आणि सखोल मार्गदर्शनही केलं. या सेमिनारला विद्यार्थी-पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. 

ध्येयवेडे व्हा 

स्पर्धा परीक्षांकडे करिअर म्हणून पाहायचं असेल, तर विद्यार्थ्याने ध्येयवेडं असणं, अतिशय गरजेचं आहे. एखाद्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम किंवा परीक्षेचं स्वरूप बदललं तर त्याची कारण समजून घेणं, महत्त्वाचं असतं. स्पर्धा परीक्षांमध्ये उतरणारे सर्वच विद्यार्थी हुशार असतात. पण या स्पर्धेत टिकून रहायचं असेल तर कल्पकता असणं गरजेचं आहे. हुशार असण्यापेक्षा स्मार्ट असाल तर या परीक्षांमध्ये तुम्ही सहज उजवे ठराल. अभ्यास पूर्ण असेल, तुमच्या उत्तरांवर ठाम राहू शकत असाल तरच परीक्षेला सामोरं जा. परीक्षेचा अभ्यास करत असताना कोणत्याही रेडीमेड अभ्यास साहित्यावर विसंबून राहू नका. डिग्री पूर्ण झाल्यावर स्पर्धा परीक्षा देणार असाल तर तेरावीपासूनच परीक्षेच्या तयारीला सुरुवात करा. डिग्री पूर्ण झाल्यावरसुद्धा खंबीर पाठिंबा म्हणून एखादी नोकरी शोधा. एमपीएससीचा अभ्यास करत असाल तर गणित आणि इंग्रजीच्या अभ्यासावर विशेष भर द्या. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अनेक पुस्तक बाजारात उपलब्ध आहेत. केवळ आयएएस झालेल्या व्यक्तींनी लिहिलेलीच पुस्तक वाचा. सरकारी अधिकारी म्हणून काम करताना तुम्हाला राज्यघटनेच्या चौकटीत राहून काम करावं लागतं. तेव्हा स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे प्रश्न हे सहज सोप्पे असतात. मात्र त्यांची नेमकी ठाम उत्तर विद्यार्थ्यांना देता आली पाहिजेत. तुमच्या विचारांत सुस्पष्टता असणं, यावेळी महत्त्वाच ठरतं. स्वतःचे नोट्स काढल्यास त्याचा फायदा यावेळी निश्चितपणे होतो. कोणत्याही योजनेची बांधणी करताना त्या योजनेचा कोणी गैर फायदा घेणार नाही. योजनेचा दुसरा पर्यायी अर्थ निघणार नाही. योजनेत कोठेही पळवाट निघणार नाही, या सर्व बाबींची काळजी घेणं गरजेचं असतं. यासाठी तुमचे विचार हे नियोजनबद्ध असणं, अतिशय महत्त्वाचं आहे. कोणाच्याही दबावाखाली काम न करता एखादी योजना ठामपणे यशस्वी पार पाडून दाखवेन हा ठामपणा तुमच्यात असावा. तुम्ही कोणत्याही क्षेत्रातून स्पर्धा परीक्षांकडे वळलात तरी हरकत नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये सर्व क्षेत्रांना समान संधी आहेत. चांगले अधिकारी असाल तर तुम्हाला खूप संधी उपलब्ध आहेत. 

- संतोष रोकडे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक 

अपयशाने शिकवलं 

इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला असतानाही आयुष्यात पुढे काय करायचं, हे माझ पक्कं नव्हतं. तेव्हा दहा वर्षानंतर मला स्वतःला कोणत्या स्थानी पाहायचं आहे, याचा मी विचार करू लागलो. कॉलेजमध्ये अभ्यासासोबतच सामाजिक उपक्रमांतही प्रामुख्याने असायचो. या वेळीच मला युपीएससीच्या परीक्षांची ओळख झाली. मित्र म्हणाले की, इंजिनीअरिंग आणि युपीएससी दोन्ही एकत्र का देत नाही. तेव्हा मी अभ्यासक्रम पहिला आणि अभ्यासाला लागलो. पुरेशी तयारी नसतानाही परीक्षेला सामोरा गेलो होतो. कँपस इंटरव्ह्यूमध्ये चांगली नोकरी मिळाली असतानाही आपण या नोकरीला पुरेसा न्याय देऊ शकत नाही, ही भावना सतत मनात होती. तेव्हा ही नोकरी सोडून पूर्ण वेळ युपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली. बेसिक गोष्टी समजून घेण्याकडे भर दिला. प्रिलियम्समध्ये मोजकेच गुण मिळाले. पण मेन्ससाठी पात्र झाल्याने आता कमी वेळात जितकं समजेल तितकं पटापट आत्मसात करून घेणं, गरजेच होतं. पण विषयाची आवड असेल, मनापासून अभ्यास केला तर विषय पटापट समजू लागतो, असं म्हणतात. माझ्या बाबतीतही तसंच होत होतं. पण दिवसभर अभ्यास करूनही तिथे माझी डाळ शिजली नाही. बराच मागचा नंबर मिळवत पास झालो. हे मोठं अपयश पचवत परत दोन दिवसांनी अभ्यासाला लागलो. मेहनतीशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही, हे तेव्हा कळून चुकलं होतं. तेव्हा वर्षभर प्रामाणिकपणे अभ्यास करत दुसऱ्या प्रयत्नात ३०३ वा आलो. पण त्या अपयशाने खूप काही शिकवलं. अपयशाने खचून न जाता अधिक मेहनतीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुमच्यात जर आवड असेल, तळमळ असेल तर तुमच्या पासून ते यश कोणीही हिसकून घेऊ शकत नाही. युपीएससीसाठी मेहनत घेत असाल तर एकमेकांना मदत करा. अभ्यासाचे साहित्य एकमेकांशी शेअर करा. युपीएससीचा असा मिळून मिसळून अभ्यास केला तरच पुढे जाता येत. युपीएससी आणि तुमचे सहकारी यांच्याबाबत योग्य दृष्टीकोन ठेवा. इतर व्यक्ती काय सल्ला देत आहेत, या पेक्षा आपल्या अभ्यासाला प्राधान्य द्या. मुलाखतीला जाताना कोणत्याही विषयाचा कमी जास्त अभ्यास करायचा नसतो. परीक्षेमध्ये कोणताही अमुक असा ट्रेंड नसतो, हे लक्षात घ्या. सर्व विषयांचा समान अभ्यास करा. अमुक एक प्रश्न परीक्षेत का विचारला गेला आहे, हे नीट समजून घ्या आणि त्यानुसारच उत्तर द्या. मुलाखत सर्वस्वीपणे तुमच्यावरच अवलंबून असते. मुलाखतीच्या वेळी बारीक बारीक गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या असतात. पण सर्वांत आधी तुम्ही स्वतःला दहा वर्षानंतर कोणत्या स्थानी पाहायचं आहे, हे आजच ठरावा. 

-अक्षय तापडिया, युपीएससी २०१३ मध्ये ३०३ वा 

अवांतर वाचनाला पर्याय नाही 

स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वाचनावर अधिक भर द्यायला हवी. यामध्ये पुस्तकांच्या वाचानापेक्षाही अवांतर वाचनावर अधिक लक्ष द्यायला हवं. त्यांच्याकडे फक्त ज्ञान असून चालत नाही तर त्याच सोबत मेहनत घेण्याचीही तयारी असावी लागते. प्रत्येकालाच स्पर्धा परीक्षा द्यायची असते. पण त्यासाठी घ्यावी लागणारी प्रचंड मेहनत मात्र अनेकांना नको असते. यशस्वी होण्यासाठी स्वप्न, संधी आणि साध्य हे तीन शब्द अतिशय महत्त्वाचे असतात. यशस्वी होण्यासाठी स्वप्न पाहणं, अतिशय गरजेचं असतं. स्वप्न पाहताना तुम्ही पाहत असलेलं स्वप्न हे नेहमी मोठं असावं. योग्य संधी लक्षात घेऊन हे स्वप्न साध्य करण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी नेहमीच असावी. यासाठी स्वतःला झोकून देता आला पाहिजे. देश बदलायचा असेल तर स्वतःपासून सुरुवात करायला हवी. युवा वर्ग स्पर्धा परीक्षांकडे वळायला हवा. ध्येय वेड असणं म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं. मग तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. 

- संगीता धायगुडे, उपायुक्त, 

वसई -विरार महानगरपालिका 

अभ्यासाचं नियोजन करा. 

सरकारी नोकरी, चांगलं पद, भरगच्च पगार आणि फिरायला सरकारी गाडी; इतकाच स्पर्धा परीक्षांचा अर्थ मला ठाऊक होता. आयआयटीमधून इंजिनीअरिंगचं शिक्षण घेण्याचं स्वप्न प्रत्येकाचंच असतं. माझं सुद्धा हे स्वप्न होतं. मात्र आयआयटीमधून इंजिनीअरिंग पूर्ण केल्यावर मला त्यात फार रस नाही, दिसून आलं. तेव्हा आयआयएममधून मी माझं एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं. आणि आयबीएमसारख्या मोठ्या कंपनीत बड्या पगाराची नोकरीही मिळाली. तिथे मोठमोठ्या प्रकल्पांवर काम करताना अनेक सरकारी अधिकाऱ्यांना भेटता आलं. त्यांच्या बोलण्यातून मला स्पर्धा परीक्षांबद्दल माहिती मिळाली. ते करत असलेलं काम फार आवडलं. मग आणखी काही अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला. कंपनीला फायदा मिळवून देण्यापेक्षा देशाला फायदा मिळवून देण्याचं हे उत्तम साधन असल्याचं तेव्हा मला कळालं. माझे काही मित्रसुद्धा युपीएससीची तयारी करत होते. त्यांनाही मी जाऊन भेटलो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीत तुम्हाला इथे समाजात काम करण्याची संधी तुम्हाला इथे मिळते, हे समजलं. सर्वांची मतं जाणून घेत अखेर दोन ते तीन महिन्यांनी ठाम निर्णय घेत मी नोकरी सोडली. तेव्हा प्रिलियमला केवळ पाच महिने उरलेले असताना मी अभ्यासाला सुरुवात केली. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास कसा करावा, इतकंच माझ्या मनात होतं. त्यानुसार प्रामाणिकपणे अभ्यास केला. स्वतःशी प्रामाणिक राहिलो. वाचनावर भर दिला. वाचलेलं समजून घेऊन त्याच्यावर खोलात जाऊन अभ्यास केला. त्या अभ्यासाचा संबंध समाजातील इतर गोष्टींशी लावण्याचा प्रयत्न केला. त्याचाच निश्चितपणे फायदा झाला. पहिल्याच प्रयत्नात नंबरात आलो. नीट वेळापत्रक बनवून अभ्यासाचं नेमकं नियोजन करा. सातत्याने अभ्यास केला तर त्याचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो. 

-जय वाघमारे, युपीएससी २०१३ मध्ये ९७३ वा 

नियोजन महत्त्वाचं... 

तुमचा स्वाभाविक कल आणि दृष्टीकोन सगळ्यात महत्त्वाचा आहे. दृष्टीकोन योग्य असेल तर स्वाभाविक कल बनवणं सहज शक्य होईल. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपला अभ्यास हा केवळ पुस्तकांपुरता मर्यादित न राहता त्यावर पुरेसं संशोधन होणं, गरजेचं आहे. आपला देश हाच आपला अभ्यास असल्याने त्याचं विद्यार्थ्यांना दडपण येण्याचं अजिबात कारण नाही. योग्य दिशेने योग्य प्रयत्न करत योग्य नियोजनाच्या सहाय्याने योग्य तयारी केली तर स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणं, फार अवघड नाही. जिद्द आणि समर्पित वृत्ती विद्यार्थ्यामध्ये असेल तर स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी निश्चितपणे उतरावं. 

- ज्योती रामदास, संकल्प आय ए एस फोरमच्या ज्येष्ठ अध्यापक 

मराठीचा न्यूनगंड कशाला? 

मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे वळताना दिसतायत. मातृभाषेवर जर प्रभुत्व असेल तर कोणतीही भाषा शिकणं तुम्हाला फार अवघड वाटणार नाही. मराठी माध्यमातून शिक्षण झालं असेल तरी इंग्रजी आणि गणित या दोन विषयांकडे अधिक लक्ष देणं गरजेचं ठरेल. पण केवळ मराठी माध्यमातून शिक्षण झाल्याचं डोक्यात ठेऊन न्यूनगंड बाळगण्याच कारण नाही. 

आरक्षणाचा विचार नको 

स्पर्धा परीक्षानंतर भरतीमध्येही संविधानिक आरक्षणाचे सर्व नियम लागू होतात. पण माणूस म्हणून आणि एक अधिकारी म्हणून सक्षम असाल तर आरक्षणाचा विचार करण्याची गरज नाही. भरतीच्या वेळी अनेक जागा अनेक पद उपलब्ध आहेत. आरक्षण आणि गुणवत्ता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अखेर गुणवत्तेशिवाय पर्याय नाही. तेव्हा आरक्षणापेक्षा गुणवत्तेला महत्त्व द्या. 

अभ्यासेतर उपक्रमही महत्त्वाचे... 

कॉलेजमध्ये तुम्ही सहभागी असलेल्या अभ्यासेतर उपक्रमांनासुद्धा स्पर्धा परीक्षांमध्ये महत्त्व दिलेलं आहे. स्पर्धा परीक्षांचा अर्ज भरताना तुम्हाला याबाबत लिहायचं असतं. एनएसएस, एनसीसी, स्टूडन्ट कौन्सिल, आदी उपक्रमांतील तुमचा सहभाग तुम्ही इथे नोंदवू शकता. मुलाखतीच्या वेळी तुम्हाला या उपक्रमांबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात. या प्रश्नांची नेमकी उत्तरं देणं गरजेचं असतं. नेतृत्त्व गुण, सामाजिक बांधिलकी, निर्णयक्षमता आदी गुण या प्रश्नांमधून तपासले जातात.
12:12 AM

Get job in nationalised bank

बँकेत भरती व्हा!

bank
२७ राष्ट्रीयकृत बँकापैकी २१ बँकांमधील (स्टेट बँक ऑफ इंडिया आणि त्यांच्या सहयोगी बँका आदी वगळून) प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी एकच सामायिक लेखी परीक्षा दरवर्षी घेतली जाते. यावर्षी २१ राष्ट्रीयकृत बँकाबरोबरीनेच अन्य बँका आणि वित्त संस्थासाठीसुद्धा ही परीक्षा ग्राह्य धरली जाणार आहे. परीक्षा घेण्याचं काम इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस) ही संस्था करत आहे. सामायिक लेखी परीक्षेसाठी प्रवेश अर्ज संस्थेच्या (www.ibps.in) वेबसाइटवर ऑनलाइन भरावे लागतील. 

ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत - २२ जुलै ते ११ ऑगस्ट २०१४ 

लेखी परीक्षा (ऑनलाईन) दिनांक - ११,१२,१८,१९ ऑक्टोबर २०१४ व १,२ नोव्हेंबर २०१४ 

वयोमर्यादा - किमान २० वर्षं, कमाल ३० वर्षं 

(अनुसूचित जाती/जमातींसाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षं तर ओबीसींसाठी ३३ वर्षं इतकी आहे.) 

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक. 

लेखी परीक्षेचं स्वरूप : लेखी परीक्षा ऑनलाईन (कॉम्प्युटराईज्ड) घेतली जाईल. प्रश्नपत्रिका २०० गुणांची असून, प्रश्नांचं स्वरुप वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव) असेल. रिझनिंग (५०), इंग्रजी (४०), क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्युड (५०), सामान्य ज्ञान (विशेषतः बँकिंग संदर्भात)(४०), संगणक ज्ञान(२०) अशी विषयवार गुणांची विभागणी आहे. परीक्षेचा कालावधी २ तासांचा आहे. चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश म्हणजेच ०.२५ इतके गुण कमी केले जातील. 

लेखी परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जाईल. मुलाखतीसाठी १०० गुण असून त्यामध्ये किमान ४० गुण (राखीव वर्गासाठी ३५ गुण) मिळवणं आवश्यक आहे. उमेदवारांची निवड करताना लेखी परीक्षेतील गुणांना ८० टक्के वेटेज असेल तर मुलाखतीतील गुणांना २० टक्के वेटेज असेल. लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील एकत्रित गुणांनुसार आय.बी.पी.एस. उमेदवारांची निवड करेल.

Monday, July 7, 2014

6:52 PM

डॉ. दाभोलकरांचा मारेकरी शोधण्यासाठी पोलिसांनी केलं प्लॅन्चेट Planchet to find Dr. Dabholkar Murderer

ज्या अंधश्रद्धेविरोधात डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी आपलं अवघं आयुष्य वेचलं त्याच अंधश्रद्धेचा वापर करून मारेकऱ्यांचा शोध घेण्याचं बिनडोक काम पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्तांनी केल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते आशिष खेतान यांनी केला आहे.


आऊटलुक या मासिकामध्ये छापून आलेल्या लेखामध्ये आशिष खेतान यांनी गुलाबराव पोळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या प्रतापाचा लेखाजोखा मांडला आहे. 

दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा छडा लागत नाही, असं दिसल्यानंतर पुण्याचे तत्कालीन पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी चक्क प्लॅन्चेटचा विधी केला. माजी पोलिस अधिकारी रणजित अभ्यंकर यांच्या साथीनं प्लॅन्चेटची विधी केल्याचा दावा खेतान यांनी केला आहे. ही माहिती खुद्द पोळ यांनीच आपल्याला दिल्याचंही खेतान यांनी सांगितलं आहे.

या तंत्र-मंत्राच्या विधीसाठी पोळ यांना साथ मिळाली ती निवृत्त पोलिस हवालदार मनिष ठाकूर यांनी. विशेष म्हणजे हा सगळा धक्कादायक प्रकार पुण्यातल्या पोलिस आयुक्तालयात झाल्याचा दावाही खेतान यांनी केला आहे.

जेव्हा हा विधी सुरु झाला त्यावेळी मनिष ठाकूर यांच्या अंगात डॉ. दाभोलकरांचा आत्मा आला आणि त्यांनी आपल्यावर हल्ला होण्याच्या आदल्या दिवशीचा घटनाक्रमही सांगितला. अशी माहिती पोलिस आयुक्त पोळां यांनी खेतान यांना सांगितल्याचं आऊटलूक मासिकातील लेखात दिली आहे.

दरम्यान हे सगळे आरोप निराधार असल्याचा दावा गुलाबराव पोळ यांनी केला असून खेतान यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचं पोळ यांनी सांगितलं आहे.

Friday, July 4, 2014

9:03 PM

एक सुट्टी पाऊण तासाची

एक सुट्टी पाऊण तासाची


दिवसातून थोडा तरी वेळ स्वतःसाठी काढला पाहिजे, स्वतःच्या आवडत्या छंदासाठी, फिटनेससाठी किमान अर्धा तास तरी काढला पाहिजे... वगैरे वगैरे असं स्त्रियांना सतत सांगितलं जातं. मुद्दा अगदी खरा असला, तर प्रश्न येतो, तो खरंच असा वेळ काढता येतो का याचा. कित्येकींना इच्छा असूनही स्वतःसाठी वेळ काढता येत नाही किंवा स्वतःसाठी वेळ काढायचा आहे हेही लक्षात राहात नाही. मग एक दिवस सगळं नकोनकोसं वाटतं. खरंच थोडासा वेळ काढून स्वतःचे लाड करावेसे वाटतात. चक्क सुट्टी घेऊन कुठेतरी निघून जावंसं वाटतं. वेगळ्या ठिकाणी फिरून आल्यानंतर मिळणारी ऊर्जा हवीहवीशी वाटते; पण जाणार कसं? म्हणून आम्ही तुम्हाला फक्त ४५ मिनिटांत सुट्टीवर जाऊन आल्यासारखा ताजेपणा कसा अनुभवायचा ते सांगणार आहोत.

साहित्य - या ४५ मिनिटांसोबतच थोडंसं साहित्यही आपल्याला लागणार आहे. ते असं... खूप दिवस वाचायचं राहून गेलेलं किंवा खूप आवडीचं एखादं पुस्तक, आवडत्या रंगाचं नेलपॉलिश, एक छोटा टब भरून कोमट पाणी, पेपरमिंट सॉल्ट (नसल्यास साधं मीठ), मऊ, गुबगुबीत टॉवेल, आवडतं ड्रिंक, आवडतं संगीत आणि आवडीचं खाणं.

काय करायचं?... सगळ्यात आधी मोबाइल, लँडलाइन, घराची बेल, टीव्ही, लॅपटॉप बंद करा.

घरातली तुमची आवडती जागा किंवा निसर्गरम्य दृष्य दाखवणारा एखादा कोपरा, खिडकी पकडा. तिथून दिसणारं दृश्य जितकं चांगलं तितकं छान. तिथं बसा आणि वाऱ्याची झुळूक अंगावर घेत आवडत्या ड्रिंकचा एक घोट घ्या. मग, तुमचे तळपाय टबमधल्या कोमट पाण्यात बुडवा. त्यात पेपरमिंट सॉल्ट टाका. आता मस्तपैकी मागे टेकून बसा आणि पुस्तक उघडा. ही झाली तुमचं मन रिलॅक्स करण्यासाठीची पहिली पायरी.

२० मिनिटांनंतर टबमधून पाय बाहेर काढा आणि टॉवेलनं पुसून घ्या. नखांना आवडीचं नेलपॉलिश लावा... ड्रिंकचा आस्वाद घेणं थांबवू नका. अधेमधे एखादा घोट घेत राहा. हळूहळू तुमचं मन शांत झालंय असं तुम्हाला जाणवेल. सगळ्या काळज्या, ताण यापासून मन दूर गेलंय आणि हलकं झालंय असं तुम्हाला वाटायला लागेल. मग, तुमच्या आवडत्या जेवणावर ताव मारा. या शॉर्ट अँड स्वीट ब्रेकनंतर येणारं फिलींग सुखदच असणार हे नक्की!
8:50 PM

Gateway to Engineering admission

गेटवे टू इंजिनीअरिंग


बहुप्रतीक्षित इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अखेर २३ जूनपासून सुरू होत आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) शुक्रवारी कागदपत्र पडताळणी, ऑनलाइन अर्ज भरणे आणि तो कन्फर्म करणे या प्रवेशाच्या प्राथमिक टप्प्याची माहिती अधिसूचनेद्वारे जारी केली आहे.

प्रवेशाचा पहिला टप्पा 

* स्वायत्त इंजिनीअरिंग कॉलेजेस, राज्य सरकारी किंवा अनुदानित इंजिनीअरिंग कॉलेजेस, युनिव्हर्सिटी मॅनेज्ड इन्स्टिट्यूट्स, युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट्स, आयसीटी, मुंबई आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत (कॅप) सहमतीने सहभागी होत असलेली खासगी इंजिनीअरिंग कॉलेजेस आदी संस्थांमधील प्रवेशांसाठी शैक्षणिक वर्ष २०१४-१५ मधील प्रवेशाचा प्राथमिक टप्पा पार पाडण्यात येणार आहे. 

* प्रवेशाच्या पहिल्या टप्प्यामध्ये ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे, तो अर्ज स्वीकृती केंद्रांवर (एआरसी) जाऊन कन्फर्म करणे आणि कागदपत्र पडताळणी करणे या प्रक्रियांचा समावेश आहे. 

प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी 

* विद्यार्थी भारतीय नागरिक असावा आणि त्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची (एचएससी बोर्ड) किंवा समकक्ष बारावीची परीक्षा दिलेली असावी. 

* फिजिक्स, गणित आणि केमिस्ट्री/बायोटेक्नॉलॉजी/बायोलॉजी/टेक्निकल व्होकेशनल (टेक्निकल व्होकेशनल विषयांची यादी 'डीटीई'च्या वेबसाइटवर आहे. त्यात आयटी विषयाचा (कोड ९७) समावेश आहे.) विषयांत ५० टक्के किंवा त्याहून अधिक (राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ४५ टक्के किंवा त्याहून अधिक) गुण मिळवलेले असावेत. 

* महाराष्ट्रातील (८५ टक्के जागा) विद्यार्थ्यांचा 'पॉझिटिव्ह कम्पोझिट स्कोअर' असावा. (या स्कोअरबाबतचा तपशील नंतर स्वतंत्रपणे जाहीर होणार आहे.) 

अर्जप्रक्रियेचे स्वरूप 

* विद्यार्थ्यांनी जवळच्या अर्ज स्वीकृती केंद्रावरून (एआरसी) रोख ७०० रुपयांना (राखवी गटातील विद्यार्थ्यांसाठी ५०० रुपये) अॅप्लिकेशन किट खरेदी करावे. 

* विद्यार्थ्यांनी 'अॅप्लिकेशन किट'च्या मदतीने www.dtemaharashtra.gov.in/fe2014 या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. त्यानंतर त्याची प्रिंट आउट काढून तो 'एआरसी'वर स्वतः जाऊन (प्रतिनिधी चालणार नाही) निश्चित करायचा आहे. या वेळी आवश्यक कागदपत्रेही (मूळ आणि साक्षांकित) सादर करायची आहेत. 

* पोस्टाने पाठवलेले अर्ज रद्दबातल ठरविण्यात येतील. 

महत्त्वाच्या सूचना 

* अॅप्लिकेशन किटमध्ये अॅप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड असेल. त्याचबरोबर प्रवेश फेऱ्यांच्या (कॅप) पायऱ्या आणि त्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे यांचीही त्यात माहिती असेल. अॅप्लिकेशन आयडी आणि पासवर्डच्या आधारे ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. 

* ऑनलाइन अर्ज सबमिट करणे आणि नंतर तो 'एआरसी'वर स्वतः जाऊन कन्फर्म करणे आवश्यक आहे. 

* महाराष्ट्रातील जे विद्यार्थी महाराष्ट्रासाठीच्या जागांबरोबरच अखिल भारतीय कोट्यातील प्रवेशासाठी इच्छुक असतील, त्यांनी एकच ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. अशा विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार दोन्हीपैकी उपलब्ध सर्वोत्तम जागा दिली जाईल. 

* भारताबाहेर बारावी किंवा समकक्ष परीक्षा देऊन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पात्रतेबाबत आधी राज्यातील विद्यापीठांकडून पडताळणी करून घ्यावी. 

* ऑनलाइन अर्ज भरून, तो 'एआरसी'वर कागदपत्र पडताळणीसह कन्फर्म करून घेतलेले आणि त्यानंतर गुणवत्ता क्रमांक (मेरिट नंबर) मिळालेले विद्यार्थीच 'कॅप'साठी पात्र ठरतील, याची नोंद घ्यावी. 

* सर्व 'एआरसी' रविवार आणि इतर सुट्ट्यांच्या दिवशीही सुरू राहतील. 

* विद्यार्थ्यांना २८ जून ते ३ जुलै या काळात 'एआरसी'वर माहिती पुस्तिका विनामूल्य मिळेल. 

* 'एआरसी'ची यादी www.dtemaharashtra.gov.in/fe2014 या वेबसाइटवर आहे. 

* हेल्पलाइन क्रमांक : ०२२-३०२३३४४४/४५/४६ 

वेळापत्रक 

* 'एआरसी'वर 'अॅप्लिकेशन किट'ची विक्री : २३ जून ते २ जुलै 

* www.dtemaharashtra.gov.in/fe2014 या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज भरणे : २३ जून ते ३ जुलै 

* 'एआरसी'वर विद्यार्थ्याने समक्ष जाऊन कागदपत्र पडताळणी आणि ऑनलाइन अर्ज कन्फर्म करणे : २३ जून ते ३ जुलै (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) 

* तात्पुरती गुणवत्ता यादी : ५ जुलै सायंकाळी ५ वाजता 

* तात्पुरत्या यादीवर आक्षेप : ६ ते ८ जुलै (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) 

* अंतिम गुणवत्ता यादी : ९ जुलै सायंकाळी ५ वाजता 

'जेईई-मेन'बाबत सूचना 

'जेईई-मेन' दिलेल्या विद्यार्थ्यांचे बारावीचे गुण त्या-त्या बोर्डाने 'सीबीएसई'कडे दिले आहेत. हे गुण www.jeemain.nic.in या वेबसाइटवर उपलोड करण्यात आले आहेत. 'जेईई-मेन' दिलेल्या विद्यार्थ्यांनी 'Confirmation of class 12th/Qualifying Examination Marks as received from Board' या लिंकवर जाऊन आपले गुण बरोबर आहेत ना, याची पडताळणी करावी. त्यात काही चूक असल्यास २७ जूनपर्यंत त्याबाबतची पूरक कागदपत्रे (गुणपत्रिका) अपलोड करावी. शंका असल्यास jeeboardmarks@gmail.com यावर ई-मेल करावी, असे आवाहन 'जेईई-मेन'च्या परीक्षा संचालकांनी केले आहे.