मॅनेजर बनताना...
प्रमोशन मिळाले म्हणून परवा निखिलला अभिनंदनाचा फोन केला , तर स्वारी काळजीत होती . आता कशाची काळजी , अशी विचारणा करताच त्याचे धडाधड प्रश्नच अंगावर आले . निखिल एका कंपनीत तीन - चार वर्षं काम करतो आहे आणि त्याला नुकतंच त्याच्याच डिपार्टमेंटचा बॉस करण्यात आलं आहे . पूर्वी ज्या लोकांच्या सोबत काम करायचो आता त्याच लोकांचा बॉस बनणं त्याला कठीण वाटत होतं . तो म्हणाला , ' या लोकांच्या बरोबर गेली तीन वर्षं काम केल्यामुळे आमचे एकमेकांशी उत्तम संबंध आहेत . अनेकदा ऑफिस संपवून एकत्र बाहेर गेलो आहोत , एकमेकांशी सुख दु : ख शेअर केली आहेत . आता त्याच लोकांसोबत बॉसचं काम कसं करू ?'
तेव्हा मी निखिलला समजावलं , की पूर्वीच्या सहकाऱ्यांचा बॉस बनावं लागलेल्या मिडल मॅनेजमेंटमधल्या ७० टक्क्यांपेक्षा अधिक जणांना अशा प्रकारच्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे . यात सहकाऱ्यांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोच ; पण तुमच्या दोस्तीचा फायदादेखील घेतला जातो . अशा वेळी तुझ्या समोर पुढील समस्या येऊ शकतात ...
आपण नियम पाळले नाहीत , तरी चालेल ; कारण नवीन बॉस आपल्यातलाच आहे , असा सहकाऱ्यांचा गैरसमज होऊ शकतो . त्यामुळे उशिरा येणं , लवकर जाणं , लंच अवर जास्त घेणं , असा फायदा ते घेऊ शकतात .
बॉसच्या एखाद्याबरोबर जरा मैत्रीपूर्वक वागण्याचा वेगळा अर्थ घेतला जातो . कुठलाही निर्णय हा मैत्रीमुळेच घेतला गेला आहे , असंही वाटू शकतं .
काही सहकारी बॉसच्या अगदी पुढंपुढं करून त्याला सतत आपल्या मैत्रीची आठवण करून देत , सवलती मागतात .
ज्यांना , तुमच्याऐवजी त्यांना प्रमोशन मिळायला हवं होतं , असं वाटत असतं , ते कामात खोट आणणं , तुमच्याबद्दल अफवा पसरवणं , असं करू शकतात किंवा तुमच्या बोलण्याचा विपर्यास करू शकतात .
निखिलला माझं म्हणणं पटल्यासारखं वाटलं . ' हो , लोकांचं वागणं नक्कीच बदललं आहे आणि पुढचे काही महिने हे मला कठीण असणार आहेत , याची जाणीवही आहे ; पण मग मी काय करू , की मला सर्वांबरोबर चांगले संबंध टिकवता येतील ?' निखिलनं विचारलं . मी म्हणाले , ' निखिल , तुमच्यातले संबध हे पूर्वीसारखे कधीही नसणार ; कारण त्यातली समीकरणं बदलली आहेत . सहकाऱ्यांच्या कामाचं परीक्षण करणं हाही कामाचा एक अविभाज्य भाग आहे . त्यामुळे इतरांशी खरी मैत्री टिकवणं जवळपास अशक्य आहे ; कारण याच सहकाऱ्यांची पगारवाढ , कामाची तपासणी , नोकरी जाणं या सगळ्या बाबींची जबाबदारी त्याच्यावर असू शकते . त्यामुळे इतरांबरोबर स्वत : ही काही पथ्यं पाळायला हवीत . गॉसिपिंग वा कामाच्या तक्रारी नकोत . काम सुटल्यावर उगाचच सतत एकत्र टाइमपास करणंही टाळायला पाहिजे .'
' हे पथ्य मी पाळेन ; पण अजून काय करायला पाहिजे ?' निखिलचा पुढचा प्रश्न तयारच होता .
' एक तर इतरांशी वागताना तुला मॅनेजर म्हणून आपलं वर्चस्व दाखवता येणं गरजेचं आहे . याचा अर्थ उगाच आरडाओरडा करून सगळीकडे लगेचच बदल करणं , असा नाही , तर सर्वांना एकत्र करून आणि त्याचबरोबर एकेकट्याशीही बोलून तुझ्या पुढच्या योजना त्यांच्यासमोर मांडल्या पाहिजेत . या परिस्थितीचा एक फायदा म्हणजे टीममधील प्रत्येकाच्या चांगल्या आणि वाईट गुणांची ओळख असणं . त्यामुळे प्रत्येकाशी बोलताना तुझी भूमिका हा त्यांच्या कामात मदत करणं आहे , हे दाखवायला विसरू नकोस . तुझ्या त्यांच्याकडून कोणत्या अपेक्षा आहेत , हे त्यांना स्पष्टपणे सांग ; पण त्यांना सांगितलेल्या कामाबाबत कोणी ऐकलं नाही , तर शांतपणे आणि आत्मविश्वासानं ; तसंच ठामपणे त्यांना अपेक्षा परत सांग आणि तरीही त्यांनी ऐकलं नाही , तर होणाऱ्या परिणामांची कल्पना दिली पाहिजे .'
' दुसरं म्हणजे ज्या लोकांना या प्रमोशनची आशा होती , त्यांनाही हळुवारपणे हाताळलं पाहिजे ; कारण तेही टीमचा एक मोठा भाग आहेत . त्यामुळे त्यांना बाजूला घेऊन त्यांच्या निराशेबद्दल बोलून तेदेखील या टीमचा एक अविभाज्य सदस्य असल्याचं व त्यांच्या कामाबद्दल आदर असल्याचं सांगून त्यांना सकारात्मकपणे सहभागी करून घे .'
' सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतरांकडून आदर मिळवण्यासाठी सगळं नीट हाताळता यायला पाहिजे . यासाठी माहीत नसलेल्या गोष्टी शिकणं , इतरांवर जबाबदारी कशी टाकावी व काम कसं करवून घ्यावं , कामाबद्दल फीडबॅक कसा द्यावा , सकारात्मक वातावरण कसं तयार करावं , हे जाणून घेणं गरजेचं आहे . सगळ्यांचं ऐकून निर्णयाची जबाबदारी तुझी आहे हे समजलं पाहिजे ; कारण एक उत्तम मॅनेजर होण्यासाठी हे उपयोगी आहे .' निखिलनं या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात आणायचं ठरवलं आहे . त्याच्या या बदलत्या काळात काय होतं , हे जाणून घ्यायला मीही आतुर आहे .