Wednesday, July 30, 2014

12:12 AM

Get job in nationalised bank

बँकेत भरती व्हा!

bank
२७ राष्ट्रीयकृत बँकापैकी २१ बँकांमधील (स्टेट बँक ऑफ इंडिया आणि त्यांच्या सहयोगी बँका आदी वगळून) प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी एकच सामायिक लेखी परीक्षा दरवर्षी घेतली जाते. यावर्षी २१ राष्ट्रीयकृत बँकाबरोबरीनेच अन्य बँका आणि वित्त संस्थासाठीसुद्धा ही परीक्षा ग्राह्य धरली जाणार आहे. परीक्षा घेण्याचं काम इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस) ही संस्था करत आहे. सामायिक लेखी परीक्षेसाठी प्रवेश अर्ज संस्थेच्या (www.ibps.in) वेबसाइटवर ऑनलाइन भरावे लागतील. 

ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत - २२ जुलै ते ११ ऑगस्ट २०१४ 

लेखी परीक्षा (ऑनलाईन) दिनांक - ११,१२,१८,१९ ऑक्टोबर २०१४ व १,२ नोव्हेंबर २०१४ 

वयोमर्यादा - किमान २० वर्षं, कमाल ३० वर्षं 

(अनुसूचित जाती/जमातींसाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षं तर ओबीसींसाठी ३३ वर्षं इतकी आहे.) 

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक. 

लेखी परीक्षेचं स्वरूप : लेखी परीक्षा ऑनलाईन (कॉम्प्युटराईज्ड) घेतली जाईल. प्रश्नपत्रिका २०० गुणांची असून, प्रश्नांचं स्वरुप वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव) असेल. रिझनिंग (५०), इंग्रजी (४०), क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्युड (५०), सामान्य ज्ञान (विशेषतः बँकिंग संदर्भात)(४०), संगणक ज्ञान(२०) अशी विषयवार गुणांची विभागणी आहे. परीक्षेचा कालावधी २ तासांचा आहे. चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश म्हणजेच ०.२५ इतके गुण कमी केले जातील. 

लेखी परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जाईल. मुलाखतीसाठी १०० गुण असून त्यामध्ये किमान ४० गुण (राखीव वर्गासाठी ३५ गुण) मिळवणं आवश्यक आहे. उमेदवारांची निवड करताना लेखी परीक्षेतील गुणांना ८० टक्के वेटेज असेल तर मुलाखतीतील गुणांना २० टक्के वेटेज असेल. लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील एकत्रित गुणांनुसार आय.बी.पी.एस. उमेदवारांची निवड करेल.

Monday, July 7, 2014

6:52 PM

डॉ. दाभोलकरांचा मारेकरी शोधण्यासाठी पोलिसांनी केलं प्लॅन्चेट Planchet to find Dr. Dabholkar Murderer

ज्या अंधश्रद्धेविरोधात डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी आपलं अवघं आयुष्य वेचलं त्याच अंधश्रद्धेचा वापर करून मारेकऱ्यांचा शोध घेण्याचं बिनडोक काम पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्तांनी केल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते आशिष खेतान यांनी केला आहे.


आऊटलुक या मासिकामध्ये छापून आलेल्या लेखामध्ये आशिष खेतान यांनी गुलाबराव पोळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या प्रतापाचा लेखाजोखा मांडला आहे. 

दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा छडा लागत नाही, असं दिसल्यानंतर पुण्याचे तत्कालीन पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी चक्क प्लॅन्चेटचा विधी केला. माजी पोलिस अधिकारी रणजित अभ्यंकर यांच्या साथीनं प्लॅन्चेटची विधी केल्याचा दावा खेतान यांनी केला आहे. ही माहिती खुद्द पोळ यांनीच आपल्याला दिल्याचंही खेतान यांनी सांगितलं आहे.

या तंत्र-मंत्राच्या विधीसाठी पोळ यांना साथ मिळाली ती निवृत्त पोलिस हवालदार मनिष ठाकूर यांनी. विशेष म्हणजे हा सगळा धक्कादायक प्रकार पुण्यातल्या पोलिस आयुक्तालयात झाल्याचा दावाही खेतान यांनी केला आहे.

जेव्हा हा विधी सुरु झाला त्यावेळी मनिष ठाकूर यांच्या अंगात डॉ. दाभोलकरांचा आत्मा आला आणि त्यांनी आपल्यावर हल्ला होण्याच्या आदल्या दिवशीचा घटनाक्रमही सांगितला. अशी माहिती पोलिस आयुक्त पोळां यांनी खेतान यांना सांगितल्याचं आऊटलूक मासिकातील लेखात दिली आहे.

दरम्यान हे सगळे आरोप निराधार असल्याचा दावा गुलाबराव पोळ यांनी केला असून खेतान यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचं पोळ यांनी सांगितलं आहे.

Friday, July 4, 2014

9:03 PM

एक सुट्टी पाऊण तासाची

एक सुट्टी पाऊण तासाची


दिवसातून थोडा तरी वेळ स्वतःसाठी काढला पाहिजे, स्वतःच्या आवडत्या छंदासाठी, फिटनेससाठी किमान अर्धा तास तरी काढला पाहिजे... वगैरे वगैरे असं स्त्रियांना सतत सांगितलं जातं. मुद्दा अगदी खरा असला, तर प्रश्न येतो, तो खरंच असा वेळ काढता येतो का याचा. कित्येकींना इच्छा असूनही स्वतःसाठी वेळ काढता येत नाही किंवा स्वतःसाठी वेळ काढायचा आहे हेही लक्षात राहात नाही. मग एक दिवस सगळं नकोनकोसं वाटतं. खरंच थोडासा वेळ काढून स्वतःचे लाड करावेसे वाटतात. चक्क सुट्टी घेऊन कुठेतरी निघून जावंसं वाटतं. वेगळ्या ठिकाणी फिरून आल्यानंतर मिळणारी ऊर्जा हवीहवीशी वाटते; पण जाणार कसं? म्हणून आम्ही तुम्हाला फक्त ४५ मिनिटांत सुट्टीवर जाऊन आल्यासारखा ताजेपणा कसा अनुभवायचा ते सांगणार आहोत.

साहित्य - या ४५ मिनिटांसोबतच थोडंसं साहित्यही आपल्याला लागणार आहे. ते असं... खूप दिवस वाचायचं राहून गेलेलं किंवा खूप आवडीचं एखादं पुस्तक, आवडत्या रंगाचं नेलपॉलिश, एक छोटा टब भरून कोमट पाणी, पेपरमिंट सॉल्ट (नसल्यास साधं मीठ), मऊ, गुबगुबीत टॉवेल, आवडतं ड्रिंक, आवडतं संगीत आणि आवडीचं खाणं.

काय करायचं?... सगळ्यात आधी मोबाइल, लँडलाइन, घराची बेल, टीव्ही, लॅपटॉप बंद करा.

घरातली तुमची आवडती जागा किंवा निसर्गरम्य दृष्य दाखवणारा एखादा कोपरा, खिडकी पकडा. तिथून दिसणारं दृश्य जितकं चांगलं तितकं छान. तिथं बसा आणि वाऱ्याची झुळूक अंगावर घेत आवडत्या ड्रिंकचा एक घोट घ्या. मग, तुमचे तळपाय टबमधल्या कोमट पाण्यात बुडवा. त्यात पेपरमिंट सॉल्ट टाका. आता मस्तपैकी मागे टेकून बसा आणि पुस्तक उघडा. ही झाली तुमचं मन रिलॅक्स करण्यासाठीची पहिली पायरी.

२० मिनिटांनंतर टबमधून पाय बाहेर काढा आणि टॉवेलनं पुसून घ्या. नखांना आवडीचं नेलपॉलिश लावा... ड्रिंकचा आस्वाद घेणं थांबवू नका. अधेमधे एखादा घोट घेत राहा. हळूहळू तुमचं मन शांत झालंय असं तुम्हाला जाणवेल. सगळ्या काळज्या, ताण यापासून मन दूर गेलंय आणि हलकं झालंय असं तुम्हाला वाटायला लागेल. मग, तुमच्या आवडत्या जेवणावर ताव मारा. या शॉर्ट अँड स्वीट ब्रेकनंतर येणारं फिलींग सुखदच असणार हे नक्की!
8:50 PM

Gateway to Engineering admission

गेटवे टू इंजिनीअरिंग


बहुप्रतीक्षित इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अखेर २३ जूनपासून सुरू होत आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) शुक्रवारी कागदपत्र पडताळणी, ऑनलाइन अर्ज भरणे आणि तो कन्फर्म करणे या प्रवेशाच्या प्राथमिक टप्प्याची माहिती अधिसूचनेद्वारे जारी केली आहे.

प्रवेशाचा पहिला टप्पा 

* स्वायत्त इंजिनीअरिंग कॉलेजेस, राज्य सरकारी किंवा अनुदानित इंजिनीअरिंग कॉलेजेस, युनिव्हर्सिटी मॅनेज्ड इन्स्टिट्यूट्स, युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट्स, आयसीटी, मुंबई आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत (कॅप) सहमतीने सहभागी होत असलेली खासगी इंजिनीअरिंग कॉलेजेस आदी संस्थांमधील प्रवेशांसाठी शैक्षणिक वर्ष २०१४-१५ मधील प्रवेशाचा प्राथमिक टप्पा पार पाडण्यात येणार आहे. 

* प्रवेशाच्या पहिल्या टप्प्यामध्ये ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे, तो अर्ज स्वीकृती केंद्रांवर (एआरसी) जाऊन कन्फर्म करणे आणि कागदपत्र पडताळणी करणे या प्रक्रियांचा समावेश आहे. 

प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी 

* विद्यार्थी भारतीय नागरिक असावा आणि त्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची (एचएससी बोर्ड) किंवा समकक्ष बारावीची परीक्षा दिलेली असावी. 

* फिजिक्स, गणित आणि केमिस्ट्री/बायोटेक्नॉलॉजी/बायोलॉजी/टेक्निकल व्होकेशनल (टेक्निकल व्होकेशनल विषयांची यादी 'डीटीई'च्या वेबसाइटवर आहे. त्यात आयटी विषयाचा (कोड ९७) समावेश आहे.) विषयांत ५० टक्के किंवा त्याहून अधिक (राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ४५ टक्के किंवा त्याहून अधिक) गुण मिळवलेले असावेत. 

* महाराष्ट्रातील (८५ टक्के जागा) विद्यार्थ्यांचा 'पॉझिटिव्ह कम्पोझिट स्कोअर' असावा. (या स्कोअरबाबतचा तपशील नंतर स्वतंत्रपणे जाहीर होणार आहे.) 

अर्जप्रक्रियेचे स्वरूप 

* विद्यार्थ्यांनी जवळच्या अर्ज स्वीकृती केंद्रावरून (एआरसी) रोख ७०० रुपयांना (राखवी गटातील विद्यार्थ्यांसाठी ५०० रुपये) अॅप्लिकेशन किट खरेदी करावे. 

* विद्यार्थ्यांनी 'अॅप्लिकेशन किट'च्या मदतीने www.dtemaharashtra.gov.in/fe2014 या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. त्यानंतर त्याची प्रिंट आउट काढून तो 'एआरसी'वर स्वतः जाऊन (प्रतिनिधी चालणार नाही) निश्चित करायचा आहे. या वेळी आवश्यक कागदपत्रेही (मूळ आणि साक्षांकित) सादर करायची आहेत. 

* पोस्टाने पाठवलेले अर्ज रद्दबातल ठरविण्यात येतील. 

महत्त्वाच्या सूचना 

* अॅप्लिकेशन किटमध्ये अॅप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड असेल. त्याचबरोबर प्रवेश फेऱ्यांच्या (कॅप) पायऱ्या आणि त्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे यांचीही त्यात माहिती असेल. अॅप्लिकेशन आयडी आणि पासवर्डच्या आधारे ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. 

* ऑनलाइन अर्ज सबमिट करणे आणि नंतर तो 'एआरसी'वर स्वतः जाऊन कन्फर्म करणे आवश्यक आहे. 

* महाराष्ट्रातील जे विद्यार्थी महाराष्ट्रासाठीच्या जागांबरोबरच अखिल भारतीय कोट्यातील प्रवेशासाठी इच्छुक असतील, त्यांनी एकच ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. अशा विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार दोन्हीपैकी उपलब्ध सर्वोत्तम जागा दिली जाईल. 

* भारताबाहेर बारावी किंवा समकक्ष परीक्षा देऊन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पात्रतेबाबत आधी राज्यातील विद्यापीठांकडून पडताळणी करून घ्यावी. 

* ऑनलाइन अर्ज भरून, तो 'एआरसी'वर कागदपत्र पडताळणीसह कन्फर्म करून घेतलेले आणि त्यानंतर गुणवत्ता क्रमांक (मेरिट नंबर) मिळालेले विद्यार्थीच 'कॅप'साठी पात्र ठरतील, याची नोंद घ्यावी. 

* सर्व 'एआरसी' रविवार आणि इतर सुट्ट्यांच्या दिवशीही सुरू राहतील. 

* विद्यार्थ्यांना २८ जून ते ३ जुलै या काळात 'एआरसी'वर माहिती पुस्तिका विनामूल्य मिळेल. 

* 'एआरसी'ची यादी www.dtemaharashtra.gov.in/fe2014 या वेबसाइटवर आहे. 

* हेल्पलाइन क्रमांक : ०२२-३०२३३४४४/४५/४६ 

वेळापत्रक 

* 'एआरसी'वर 'अॅप्लिकेशन किट'ची विक्री : २३ जून ते २ जुलै 

* www.dtemaharashtra.gov.in/fe2014 या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज भरणे : २३ जून ते ३ जुलै 

* 'एआरसी'वर विद्यार्थ्याने समक्ष जाऊन कागदपत्र पडताळणी आणि ऑनलाइन अर्ज कन्फर्म करणे : २३ जून ते ३ जुलै (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) 

* तात्पुरती गुणवत्ता यादी : ५ जुलै सायंकाळी ५ वाजता 

* तात्पुरत्या यादीवर आक्षेप : ६ ते ८ जुलै (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) 

* अंतिम गुणवत्ता यादी : ९ जुलै सायंकाळी ५ वाजता 

'जेईई-मेन'बाबत सूचना 

'जेईई-मेन' दिलेल्या विद्यार्थ्यांचे बारावीचे गुण त्या-त्या बोर्डाने 'सीबीएसई'कडे दिले आहेत. हे गुण www.jeemain.nic.in या वेबसाइटवर उपलोड करण्यात आले आहेत. 'जेईई-मेन' दिलेल्या विद्यार्थ्यांनी 'Confirmation of class 12th/Qualifying Examination Marks as received from Board' या लिंकवर जाऊन आपले गुण बरोबर आहेत ना, याची पडताळणी करावी. त्यात काही चूक असल्यास २७ जूनपर्यंत त्याबाबतची पूरक कागदपत्रे (गुणपत्रिका) अपलोड करावी. शंका असल्यास jeeboardmarks@gmail.com यावर ई-मेल करावी, असे आवाहन 'जेईई-मेन'च्या परीक्षा संचालकांनी केले आहे.
8:42 PM

Opportunity in Physiotherapy

फिजिओथेरपीमध्ये भरघोस संधी

बायोलॉजीची एक शाखा म्हणजे फिजिओथेरपी. रोजच्या आयुष्यात आपल्या शरीराची हालचाल नीट होणं आवश्यक असतं. प्रत्येक अवयवाचं कार्य पूर्ण क्षमतेने व्हावं लागतं. पण काही वेळेस अपघात किंवा अशाच काही प्रसंगांमुळे अवयव, सांधे आखडतात किंवा दुखावतात. अशा वेळी त्या अवयवांना किंवा सांध्यांना पुन्हा सुधारण्याचं काम फिजिओथेरपिस्ट करतात. नर्सेस आणि अॅक्युपेशनल थेरपिस्ट यांसारख्या हेल्थ प्रोफेशनल्सबरोबरही फिजिओथेरपिस्ट काम करतात.

स्पेशलायझेशन :

1. कार्डिओपलमोनरी फिजिओथेरपिस्ट:
अस्थमा, छातीमधील संसर्ग तसेच, मोठ्या सर्जरीनंतर पेशंटना स्वत:ची तब्येत सुधारण्यासाठी सहाय्य करण्याचे काम हे तज्ज्ञ करतात. हृदयासंबंधित आजार आणि श्वसनाच्या आजारांमधून बाहेर पडण्यासाठी फिजिओथेरपिस्ट मदत करतात.

२. गेरिअॅट्रिक फिजिओथेरपिस्ट :
वय वाढल्यामुळे वृद्धांमध्ये येणाऱ्या समस्या सोडवणं आणि त्यांच्या शरीराचं कार्य अधिक कार्यक्षमतेने सुरू राहण्यासाठी हे तज्ज्ञ मदत करतात.

३. मस्क्यूलोस्केलेटल फिजिओथेरपिस्ट :
हे तज्ज्ञ स्नायूंच्या बिघडलेल्या हालचालींचं निरीक्षण करून, पेशंटची मेडिकल हिस्ट्री अभ्यासून त्याला बरं करतात.

४. न्यूरोलॉजिकल फिजिओथेरपिस्ट :
मेंदूशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी न्यूरोलॉजिकल फिजिओथेरपिस्ट मदत करतात.

५. पीडियॅट्रिक फिजिओथेरपिस्ट :
हे तज्ज्ञ लहान मुलांमधील समस्या सोडवतात.

६. स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट :
खेळाडूंना येणाऱ्या समस्या सोडवण्याचं काम स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट करतात.

फिजिओथेरपी या क्षेत्रात करिअर करायचं असेल, तर बारावी सायन्सनंतर डिप्लोमा किंवा बॅचलर डिग्री करता येईल. बॅचलर डिग्री कोर्सला प्रवेश घेण्यासाठी संबंधित प्रवेश परीक्षा द्यावी लागते.

फिजिओथेरपिस्ट कोर्स उपलब्ध असणाऱ्या संस्था :

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, अॅक्युपेशनल थेरपी

वेबसाइट : www.dypatil.com

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन

वेबसाइट : www.aiipmr.gov.in

स्कूल ऑफ फिजिओथेरपी, ऑर्थोपेडिक सेंटर, केईएम हॉस्पिटल,

वेबसाइट : www.kem.edu

स्कूल ऑफ फिजिओथेरपी, बीवायएल नायर हॉस्पिटल

वेबसाइट : www.nair.edu
8:39 PM

Opportunity in Bank Jobs

बँकेत नोकरीची संधी!


प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये ऑफिसर्स आणि असिस्टंटची भरती होणार आहे. त्याद्वारे नोकरीच्या अनेक चांगल्या संधी आहेत. 

देशभरातील ५६ प्रादेशिक ग्रामीण बँकातील ऑफिसर्स आणि असिस्टंटच्या पदांच्या भरतीसाठी दरवर्षी आय.बी.पी.एस. (इंडियन बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) परीक्षा घेते. ज्या राज्यांमध्ये संबंधित बँक आहे त्या राज्याची राजभाषा उमेदवाराला येणं आवश्यक आहे. संबंधित भाषा उमेदवाराने १० वी/ १२ वी किंवा पदवीस्तरावर शिकलेली असणं आवश्यक आहे. तसेच सर्व पदांसाठी संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. 

वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता 

ऑफिसर्स श्रेणी - ३ 

किमान २१ वर्षे कमाल ४० वर्षे, पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण आवश्यक, क़ृषि विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम, लॉ, मॅनेजमेंट, अकाऊंटस, अर्थशास्त्र, पशुवैद्यकीय अभ्यासक्रम, आय.टी., बँकीग, फायनान्स, मार्केटिंग या विषयातील पदवीधरांना प्राधान्य दिले जाईल. ऑफिसर म्हणून बँकेत किंवा वित्त संस्थेत ५ वर्षे कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. 

ऑफिसर्स श्रेणी - २ 

किमान २१ वर्षे , कमाल - ३२ वर्षे, पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण आवश्यक. कृषि विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम, लॉ, मॅनेजमेंट, अकाऊंटस, अर्थशास्त्र, पशुवैद्यकीय अभ्यासक्रम, आय.टी., बँकीग, फायनान्स, मार्केटिंग या विषयातील पदवीधरांना प्राधान्य दिले जाईल. 

या श्रेणीमध्ये आय.टी.ऑफिसर, चार्टर्ड अकाउंटंट, लॉ ऑफिसर, ट्रेझरी मॅनेजर, मार्केटिंग ऑफिसर, कृषि अधिकारी या स्पेशालिस्ट ऑफिसर्सचीसुद्धा निवड केली जाईल. संबंधित विषयातील पदवी अभ्यासक्रमामध्ये उमेदवाराने उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच आपल्या क्षेत्रातील कामाचा १ / २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. 

ऑफिसर्स श्रेणी - १ 

किमान - १८ वर्षे, कमाल - २८ वर्षे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी क़ृषि विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम, लॉ, मॅनेजमेंट, अकाऊंटस, अर्थशास्त्र, पशुवैद्यकीय अभ्यासक्रम, आय.टी. या विषयातील पदवीधरांना प्राधान्य दिले जाईल. 

असिस्टंट 

किमान - १८ वर्षे, कमाल - २८ वर्षे, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी 

निवडप्रक्रिया - सर्व पदांसाठी स्वतंत्र लेखी परीक्षा घेतली जाते. परीक्षेचं स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असून संगणकावर ऑनलाईन पध्दतीने घेतली जाते. पदांनुसार लेखी परीक्षेतील विषयांमध्ये बदल केले जातात. लेखी परीक्षा ही २०० गुणांसाठी घेतली जाते. चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा केले जातात. 

प्रवेश अर्ज - प्रवेश अर्ज ऑनलाईन भरायचे आहेत. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत ९ जुलै २०१४ आहे. लेखी परीक्षा ऑगस्ट शेवटच्या आठवडयापासून ते सप्टेंबर महिना अखेरीपर्यंत घेतल्या जातील. प्रवेश अर्ज भरण्यासाठी तसेच सविस्तर माहितीसाठी www.ibps.in ही वेबसाईट पहावी.
8:18 PM

Less Marks, more opportunity after SSC

कमी मार्क जास्त संधी


कमी मार्क मिळाले म्हणजे करिअरचे सगळे राजमार्ग आपल्यासाठी बंद झाले, असा अनेकांचा समज होतो. पण तसं अजिबात नाही. करिअरच्या अनेक वाटा आहेत, फक्त त्या आत्मविश्वासाने शोधायला हव्यात. 

एफवायच्या प्रवेशाची प्रक्रिया संपून आता कॉलेजेस सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. पण ४५ ते ७० टक्क्यांदरम्यान गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांसमोरील करिअर निवडीचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. अशा विद्यार्थ्यांचे प्रमाण ५५ टक्क्यांच्या जवळपास आहे. या विद्यार्थ्यांना करिअरची योग्य दिशा सापडावी यासाठी मटातर्फे 'कमी मार्कांत उज्वल भविष्य' हा उपक्रम गेली काही वर्षे सातत्याने राबवला जात आहे. ठाण्यातील सरस्वती विद्यामंदिरमध्ये झालेल्या अशाच एक सेमिनारमध्ये करिअर कौन्सिलर सुचित्रा सुर्वे (डायरेक्टर, ग्रोथ सेंटर) आणि लक्ष्मीबाई ज्युनिअर कॉलेजच्या प्रिन्सिपल पूजा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना याबद्दल मार्गदर्शन केलं.

इंग्रजीची भीती सोडा, 

प्रा. पूजा कुलकर्णी 


सर्वप्रथम यांनी कमी गुण मिळण्याची कारणे याबद्दल सांगितले. यातील महत्वाचे कारण म्हणजे इंग्रजी भाषेबद्दलचा न्यूनगंड. बरेचदा दहावीमध्ये चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना बारावीत कमी गुण मिळतात. यामध्ये मराठी माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. याचं मुख्य कारण म्हणजे दहावीपर्यंतचा अभ्यास मातृभाषेत असल्याने तो सोपा वाटतो. पण इंग्रजीच्या बेसिक गोष्टींकडे लक्ष न दिल्याने इंग्रजीची भीती वाटू लागते. ही भाषा आपल्याला येणारच नाही या भीतीने एक प्रकारचा न्यूनगंड त्यांच्या मनात निर्माण होतो. याचबरोबर आजच्या सोशल मिडियामुळे इंग्रजीचा ऱ्हास होत आहे. मेसेजिंग लँग्वेजमुळे अनेक भाषांची सरमिसळ करून वाक्य लिहिली जात आहेत. पण त्यामुळे इंग्रजी वाक्यरचनेचा बेसच मुलांच्या लक्षात येत नाही. इंग्रजी वाचत नाहीत, लिहित नाहीत आणि मुख्य म्हणजे ऐकत नाहीत. त्यामुळेच त्यांची इंग्रजी भाषेची भीती अधिकाधिक गडद होत जाते. पण खरंतर या भीतीचं अवडंबर करण्याची मुळीच गरज नाही. इंग्रजीचा न्यूनगंड बाळगल्याने कितीतरी हुशार विद्यार्थी कोशात जातात. आपल्याला हे जमणारच नाही, एखादा विषय कळणारच नाही ही संकुचित वृत्ती निर्माण होते. त्यामुळे भीती न बाळगता यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. याची पहिली पायरी म्हणजे सकारात्मक दृष्टीकोन. सकारात्मक दृष्टीकोन बाळगणे १००% तुमच्याच हाती असते. कोणत्याही गोष्टीची घोकंपट्टी करण्यापेक्षा त्याचे अवलोकन करा. भरपूर वाचा. त्याचा अर्थ समजून घ्या. आपली पाठ्यपुस्तक व्यवस्थित वाचा. याचबरोबर विषयाशी निगडीत इतरही वाचन करा, त्यामुळे मूळ विषय सोपा वाटतो. इंग्रजी शिक्षणावर खूप भर देण्याचे कारण म्हणजे इंग्रजी तुमच्या करिअर आकार देणारा मुलभूत पाया आहे. इंग्रजी भाषा पक्की झाली कि त्या भाषेतील इतर विषय आपोआप समजतात. 

सकारात्मक विचार करा 

सुचित्रा सुर्वे 


अनेक विद्यार्थ्यांमध्ये असा गैरसमज आहे थोडे कमी मार्क मिळाले म्हणजे आपल्यासमोरील चांगल्या करिअरचे पर्याय संपले आहेत. पण कमी मार्क मिळाल्यानंतरही उत्तम करिअर घडवण्याचे अनेक पर्याय विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध आहेत. कमी मार्क आहेत म्हणून आपण झिरो आहोत हा विचार करणे सोडून द्या. ८०% पेक्षा जास्त मार्क मिळाले की फक्त मेडिकल आणि इंजीनिअरिंगचा विचार अजूनही केला जातो. त्यातही मेडिकल म्हटले की एमबीबीएस आणि इंजीनिअरिंग म्हटले की इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल अशा काही मळलेल्या वाटांचाच विचार केला जातो. मात्र या क्षेत्रांमध्ये अजूनही अनेक प्रकारचे विषय असतात. त्यामुळे कमी मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना कुछ हटके विचार करण्याची आणि चांगले करिअर निवडण्याची संधी निर्माण झालेल्या आहेत. कमी मार्क मिळाले म्हणून खचून न जाता सरळ बीए, बीकॉम बीएस्सी यांसारख्या प्लेन ग्रॅज्यूएशन कोर्सेसमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करा. त्यामुळे तुमचं बेसिक पक्कं होईल. हे कोर्सेस करताना तुम्हाला तुमच्या आवडीच्या विषयात शॉर्ट टर्म कोर्सेस, अॅडऑन कोर्सेस, हॉबी कोर्सेस करता येतील. आजकाल तरुणाईचा ओढा बीएएफ, बीएमएम, बँकिंग इन्श्युरन्स यांसारख्या सेल्फ फायनान्स कोर्सेसकडे आहे. प्लेन ग्रॅज्यूएशन कोर्सेसमधून तुम्हाला त्याच दर्जाचं शिक्षण मिळतं. त्यामुळे प्लेन पदवीनंतर तुम्हालाह या क्षेत्रांमध्ये संधी मिळतात. याचबरोबर बीएस्सी करून तुम्ही मेडिकलच्या पॅरामेडीकल, आयुर्वेद, इंजिनीअरिंगच्या सिरॅमिक, अॅग्रीकल्चरल यांसारख्या वेगळ्या वाटांचा विचार करावा. त्याचबरोबर नर्सिंग आणि टीचिंग क्षेत्रात अनेक संधी आज निर्माण झाल्या आहेत. याचबरोबर आर्ट‍्समधूनही अनेक संधीची दारे उघडली गेली आहेत. हिस्टरी, फिलॉसॉफी, सायकॉलॉजी, इकोनॉमिक्स आणि महत्वाचं म्हणजे रिसर्च क्षेत्रात आर्ट‍्सचे विद्यार्थी करिअर करू शकतात. 

इतरही काही पर्याय... 

बायोटेक्नॉलॉजीमध्ये करिअर... बायोटेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात रिसर्च करणाऱ्यांसाठी खूप संधी आहेत. प्लेन सायन्सनंतर बायोलॉजी आणि बायोटेकनॉलॉजी करता येईल. 

एनडीए... एनडीएची प्रवेश प्रक्रिया ही खूपच कठीण असते. त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. लेखी परीक्षेनंतर फिजिकल टेस्टसुद्धा पास होणे गरजेचे असते. एनडीएमधून बाहेर पडल्यानंतर सैनिक म्हणून नाही तर कमांडर पदासाठी नियुक्ती होते. त्यानंतर विद्यार्थ्यांना डिफेन्सच्या आर्मी, नेव्ही, आणि एअरफोर्स यापैकी कोणत्याही भागात ७ वर्षांच्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन मिळते. ७ वर्षानंतर विद्यार्थ्याला त्याच्या इच्छेनुसार पुढे सर्व्हिस वाढवता येते अथवा तो निवृत्ती घेऊन सिव्हिल आयुष्य जगू शकतो. डिफेन्समधून निवृत्ती घेतल्यानंतर कोणत्याही कंपनीत जॉब मिळतो. 

अॅग्रीकल्चर... अॅग्रीकल्चर म्हणजे केवळ शेती करणं नसून यामध्ये पिके, मासे यांसारख्या विषयात रिसर्चसाठी खूप संधी उपलब्ध आहेत. माणसाला जगण्यासाठी अन्नाचीच गरज असल्याने अन्न निर्मिती आणि फूडरिसर्च या क्षेत्रामध्ये नेहमीच खूप संधी उपलब्ध असतात.